पोलिसांनी सापळा रचला, जोडप्याला रुग्णालयात पाठवलं, नंतर डॉक्टराला रंगेहाथ पकडलं, नेमकं काय घडलं?

इचलकरंजी शहरात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज (11 ऑगस्ट) उघडकीस आला. शहरातील एक महिला एजंट हा प्रकार चालवत होती.

पोलिसांनी सापळा रचला, जोडप्याला रुग्णालयात पाठवलं, नंतर डॉक्टराला रंगेहाथ पकडलं, नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सापळा रचला, जोडप्याला रुग्णालयात पाठवलं, नंतर डॉक्टराला रंगेहाथ पकडलं

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज (11 ऑगस्ट) उघडकीस आला. शहरातील एक महिला एजंट हा प्रकार चालवत होती. याप्रकरणी विकली मार्केट परिसरातील काटकर रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. गावभाग पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे हा गैरप्रकार उघडकीस आणला. संबंधित रुग्णालयावर दुसऱ्यांदा गर्भलिंग चाचणी होत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या कारवाईचं शहरात कौतुक

इचलकरंजी शहरात विकली मार्केट परिसरात असणाऱ्या काटकर या खासगी रुग्णालयात बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी निर्भया पथकाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निर्भया पथकाच्या प्रमुख तेजश्री पवार, पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक जयश्री विभूते तसेच जिल्हा चिकित्सक गौरी पाटील या तिघींनी मिळून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांचे या धाडसी कारवाईमुळे नागरिकांमध्ये कौतुक होऊ लागले आहे.

पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून रुग्णालयातील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करुन आज या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होऊ लागले आहे.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

गांवभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका जोडप्याला रुग्णालयात पाठवले होते. यावेळी सदर रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणीसाठी 25 हजारांची रक्कम घेतली जात असल्याचे सदर जोडप्याला आढळले. याचवेळी निर्भया पथक तसेच जिल्हा आरोग्य पथकाने संयुक्तरित्या या रुग्णालयात छापा टाकला. त्यांना याठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा प्रकार दिसून आला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक विलास देशमुख, आर. आर. शेटे, डॉ. व्ही. एस. शिंदे, अॅड. गौरी पाटील यांच्यासह आरोग्य पथकाने रुग्णालयाची कसून तपासणी केली. यामध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन आणि वैद्यकीय साहित्य ताब्यात घेवून जप्त करण्यात आले. यावेळी सदर रुग्णालयास पाच बेडचा परवाना असून याठिकाणी जास्त बेड असल्याचे निदर्शनास आलं. तसेच बॉम्बे नर्सिंग होमच्या लायसन्सची मुदत संपली असून त्याचे नूतनीकरण देखील करण्यात आले नसल्याचे या तपासणीत उघडकीस आले.

आरोपी डॉक्टर दाम्पत्याची कसून चौकशी

याप्रकरणी काटकर रुग्णालयाचे डॉ. बी. एच. काटकर आणि त्यांची पत्नी डॉ. वैशाली काटकर यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु ठेवली आहे. तसेच दुपारच्या सुमारास तालुका आरोग्य पथकाने देखील सदर रुग्णालयाला भेट देवून संबंधितांची कसून चौकशी केली.

संबंधित रुग्णालयावर दुसऱ्यांदा कारवाई

दरम्यान गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी सदर रुग्णालयावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी 2009 साली लक्ष्मी मार्केट परिसरात काटकर रुग्णालयावर कारवाई करण्यात आली होती. त्यातून 2018 साली सदर रुग्णालयाचे डॉक्टर बी. एच. काटकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वीच विकली मार्केट परिसरात नव्याने रुग्णालय सुरु केले होते. सदर रुग्णालयावर दुसऱ्यांदा गर्भलिंग चाचणी होत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार, महिला भक्ताच्या आरोपानंतर मुंबईत भोंदूबाबाला बेड्या

जमीन मालकीच्या वादातून जुन्या-नवीन मालकांमध्ये हाणामारी, सीसीटीव्हीवरही दगडफेक

Published On - 4:19 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI