पती-पत्नीचे भांडण सोडवायला जाणे पोलिसांना महागात पडले, पोलिसांनाच लाथा-बुक्क्या घातल्या !

एका महिलेला तिचा पती भररस्त्यात मारहाण करत असल्याची माहिती पोलीस कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र मदतीला गेलेल्या पोलिसांसोबत जे घडले ते भयंकर.

पती-पत्नीचे भांडण सोडवायला जाणे पोलिसांना महागात पडले, पोलिसांनाच लाथा-बुक्क्या घातल्या !
कल्याणमध्ये रेस्टॉरंट मॅनेजरवर हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 11, 2023 | 6:12 PM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात पती-पत्नीमधील भांडण सोडवणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. भांडण मिटवायला गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त पतीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर पती विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. नागेशनाथ निवृत्ती घुगे आणि हवालदार सांगळे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत, महेश माने असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

एक व्यक्ती पत्नीला शिवीगाळ करत होता

कल्याण कोळसेवाडी पोलिसांना कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात एका सोसायटीत पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करत होता. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलीस त्या महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहचले. घरी गेल्यावर तेथे पती महेश माने हा पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला मारहाण करत होता.

पोलीस समजवायला गेले असता त्यांना मारहाण केली

पोलीस कर्मचारी घुगे आणि सांगळे यांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. मात्र संतप्त पतीने तुम्ही मला सांगणारे कोण ? असा प्रश्न करत पोलिसांनाच शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांना घराबाहेर फरफटत नेले. इमारतीखालील वाहनतळावरील दुचाकीवर हवालदार घुगे यांना लोटून दिले. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

संतप्त महेश हा दोन्ही पोलिसांना दाद देत नसल्याने पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून वाढीव कुमक मागवली. नंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी महेशला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.