पोटच्या तीन मुलींवर अत्याचार, नराधम बापाच्या कृत्याने नालासोपारा हादरलं, एका मुलीचा चारवेळा गर्भपात

आरोपी हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 16 सप्टेंबर 2004 प्रकाश मोरे याची आरोपीने हत्या केली होती, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली. नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

पोटच्या तीन मुलींवर अत्याचार, नराधम बापाच्या कृत्याने नालासोपारा हादरलं, एका मुलीचा चारवेळा गर्भपात
| Updated on: Feb 27, 2025 | 1:31 PM

जगात बाप आणि मुलीच सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र नातं मानलं जातं. मुलीवर कितीही मोठं संकट आलं तर तिने बापाच्या खांद्यावर मान टाकली की तिची सर्व दुःख नाहीशी होतात. पण याच पवित्र नात्याला नालासोपाऱ्यात एका नराधम बापाने काळिमा फसला आहे. या बापाने पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी वासनांध विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्या, सुपारी घेऊन हत्या, दरोडा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2017 पासून या विकृत वासनांध बापाने आपल्याच मुली, पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटच्या तीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या विकृताला 5 मुली, पत्नी, आणि एक मुलगा आहे. आईला ही घटना माहीत झाल्यानंतर तिला ही मारहाण केली.

अखेर आईने नालासोपारा गाठले

शेवटी अशा विकृत व्यक्तींच्या तावडीतून सुटण्यासाठी आईने आपल्या मुलींना घेऊन विरार नालासोपारा गाठले. सर्व घटना नातेवाईकाला सांगितल्यावर काल नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे.

मुलीचा चारवेळा गर्भपात

मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला पाच मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा चारवेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याराचाविरोधात तक्रार नोंदवण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे.

शहरात संताप

आता पर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे