Pune News : ‘तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला’, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune News : सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाणे चौघांनी त्यांना मारहाण केली. त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावलं. रिक्षात डांबून बेदम मारहाण केली.

पुण्यात पोलिस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मोबाईल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला. चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजीत डोंगरे या तिघांना अटक केली. त्यांच्या अन्य एका साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. फिर्यादी जाधव हे सहकारनगर पोलिस ठाण्यात तैनात आहेत. ते रामोशीवाडी एस.बी.रोड परिसरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मध्यप्राशन करताना दिसले. ते चौघे गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावलं. रिक्षात डांबून बेदम मारहाण केली.
‘ठार मारून टाक’
तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला असे म्हणत आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाणे चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले.
‘माझी तक्रार तर दाखल करून घ्या साहेब’
काही वेळानंतर चतुःश्रृंगी पोलिस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत चौघे तेथून फरार झाले होते. जाधव यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यावेळी तेथील अधिकार्यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून नेली, जाधव यांनी माझी तक्रार तर दाखल करून घ्या साहेब असे म्हटल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.