एका जीवाची किंमत केवळ 500 रुपये?, उधार घेतलेले पैसे परत केले नाही; मग…

उधार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून शेजाऱ्याने शेजाऱ्यासोबत जे केले ते पाहून सर्वच हादरले. उधार घेतलेले पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्याने शेजाऱ्याने भयंकर कृत्य केले.

एका जीवाची किंमत केवळ 500 रुपये?, उधार घेतलेले पैसे परत केले नाही; मग...
500 रुपयांसाठी शेजाऱ्याला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2023 | 5:26 PM

मालदा : पैसा हा व्यक्तीला कुठल्या थराला नेईल याचा नेम नाही. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील मालदा येथे उघडकीस आली आहे. उधार घेतलेले 500 रुपये दिले नाही म्हणून शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत व्यक्तीचा मृ्त्यू झाल्याची घटना मालदा जिल्ह्यातील बामंगोला येथे घडली. बनमाली प्रामाणिक असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रफुल्ला रॉय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बनमालीने प्रफुल्लाकडून 500 रुपये उधार घेतले होते

बनमाली प्रामाणिक याने प्रफुल्ला रॉय याच्याकडून 500 रुपये उधार घेतले होते. प्रफुल्ला हे पैसे वारंवार परत मागत होता. काही कारणाने तो पैसे परत करु शकत नव्हता. रविवारीही प्रफुल्ला पैसे परत मागण्यासाठी बनमालीकडे गेला. मात्र बनमाली आता पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर प्रफुल्ला तेथून निघून गेला.

पैसे परत केले नाही म्हणून जीवघेणा हल्ला केला

काही वेळाने बनमाली एका चहाच्या दुकानात बसला होता. यावेळी प्रफुल्ला याने मागून जाऊन त्याच्यावर बांबूने हल्ला केला. प्रफुल्ला याने बनमालीला बांबूने खूप मारहाण केली. यात बनमालीच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. यानंतर बनमाली कसाबसा घरी पोहचला. घरी गेल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. बनमालीला त्याच्या भावाने तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. बनमालीचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.