हुबेहुब दुलकर सलमानच्या सिनेमासारखंच घडलं… स्वत:च्याच मृत्यूचा कट, मित्राचाच खून करून… जालना हादरलं

जालन्यात दुलकर सलमानच्या 'कुरुप' सिनेमासारखा भयानक गुन्हा उघडकीस आला आहे. नितीन गवळी याने कर्जातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी त्याने मित्र संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह कारमध्ये ठेवून ती पेटवून दिली.

हुबेहुब दुलकर सलमानच्या सिनेमासारखंच घडलं... स्वत:च्याच मृत्यूचा कट, मित्राचाच खून करून... जालना हादरलं
burning car
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 6:37 PM

गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्या पातळीवर जाईल याचा काही नेम राहिला नाही. गुन्हेगाराकडून कोणता बनाव केल्या जाईल हे सांगता येत नाही. पण प्रत्येक गुन्ह्यामागे काही तरी हेतू असतो. काही तरी कारण असतं. त्याशिवाय गुन्हा होत नाही. आता तर सिनेमा, मालिका आणि गुन्हेगारी सीरिज पाहून लोक गुन्हे करू लागले आहेत. जालन्यातही असाच एक गुन्हा उघडकीस आला आहे. सिनेमातील पटकथेसारखीच कथा रचून हा खून झाल्याचं समोर आलंय. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानच्या एका सिनेमातील कथेप्रमाणेच ही खूनाची कथा घडलीय. त्यामुळे पोलीसही हादरून गेले आहेत.

जालन्यातून एक बातमी समोर येत आहे. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली. अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाणचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार पेटवून दिल्याच तपासात समोर आलं आहे. म्हणजे खून झालाच नाही. अपघात झाला आणि कारने पेट घेतला असं भासवण्याचा प्रयत्न नितीन गवळीने केला. पण पोलिसांच्या शिताफीतून तो सुटला नाही. अखेर तो जाळ्यात घावलाच.

दोन दिवसांपूर्वी काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामाही केला. पोलिसांनाही सुरुवातीला हा अपघात असल्याचं जाणवलं. घातपात असण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. पण पोलिसांनी सखोल तपास केला आणि तपासाअंती हा अपघात नसून खून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवळी ,अमित फुलारे आणि आकाश गवळी या आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती जालनाच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

खाक्या दाखवताच ओकला

पोलिसांनी नितीन गवळीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर प्रश्नाचा भडिमार केला. पण सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. मग पोलिसांनी वर्दीचा खाक्या दाखवताच नितीन पोपटासारखा बोलू लागला. त्याने जे जे घडलं ते सर्व सांगितलं. कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. मृत्यू झाल्याचं भासवून विमा पॉलिसीचे पैसे मिळवणार होता. विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मित्राचा खून केला. त्याचा कारमध्ये मृतदेह ठेवून ती कार पेटवून दिली. कारजवळ नितीनने त्याच्या काही वस्तू ठेवल्या होत्या. जेणेकरून नितीनचाच अपघात होऊन तो मेलाय असं लोकांना वाटलं पाहिजे, म्हणून त्याने हा बनाव केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कुरुपमध्ये काय घडलं?

दुलकर सलमानचा कुरुप हा प्रसिद्ध सिनेमा आहे. या सिनेमा एक क्राईम थिलर आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी नायक स्वत:च्या खूनाचा बनाव रचतो. त्यासाठी तो एकाचा खून करतो. पण नंतर त्याचा कारनामा उघड होतो. जालन्यातही असाच काही प्रकार घडल्याचं दिसून येतंय.

Follow Us