पोलीस वर्दीतील तो जवळ आला, धक्का दिला अन्… कल्याणमध्ये काय घडलं ?
कल्याणमधील एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बनावट पोलीस अधिकाऱ्याने लुटले आहे. आरोपीने मोबाईल फुटल्याचे नाटक करून ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याची अंगठी आणि मोबाईल पळवला. घटनेनंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच कल्याणमध्ये फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसाने लुटल्याचे समोर आले आहे. यानंतर मोबाईल फुटल्याचे नाटक करून आरोपीने भरपाईच्या नावाखाली ज्येष्ठाची सोन्याची अंगठी आणि मोबाईल पळवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी भागातील अन्नपूर्णानगरमध्ये राहणारे प्रमोद भास्कर जोशी (७०) हे रविवारी सकाळी खरेदीसाठी बाहेर पडले होते. नेहमीप्रमाणे ते सहजानंद चौक ते गणपती चौक दरम्यान पायी जात होते. त्याचवेळी अचानक एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का दिला. या धक्क्यामुळे जोशींचा सावरण्याआधीच, त्या व्यक्तीने आपला मोबाईल जमिनीवर पाडला. यानंतर त्याने तुमच्यामुळे माझा मोबाईल फुटला आहे, मी पोलीस आहे, तुम्ही भरपाई द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही,’ असा कांगावा करत धमकी द्यायला सुरुवात केली.
तोतया पोलिसाच्या या अनपेक्षित आणि धमकीयुक्त बोलण्याने प्रमोद जोशी पूर्णपणे गोंधळून गेले. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने मोठ्या चलाखीने त्यांच्या हातातील मोबाईल आणि सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून, मोबाईल गॅलरीकडे नेण्याचे नाटक केले. रिक्षा गांधारी रस्त्यावर पोहोचल्यावर आरोपीने एक नवीच शक्कल लढवली.
त्याने तुमचा मोबाईल मिळाला असे सांगत एक मोबाईल रस्त्यावर फेकून दिला. यानंतर रिक्षासह तिथून पळ काढला. रस्त्यावर पडलेला मोबाईल प्रमोद जोशी यांनी उचलून पाहिला. तेव्हा तो त्यांचाच असल्याचे लक्षात आले. पण त्यांची सोन्याची अंगठी मात्र गायब झाली होती. आपल्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रमोद जोशी यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसात तक्रार दाखल
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या तोतया पोलिसाचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. तसेच हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
