Kandivali Crime: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीकडून ओळख अन्… भयंकर घटनेने कांदिवलीत खळबळ
या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या ओळखीच्या मैत्रिणीमार्फत काही तरुणांशी ओळख करुन देण्यात आली. या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Kandivali Crime: कांदिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली पुर्वेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवली पुर्वेतील हनुमान नगरपरिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य पाच आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांदिवली पूर्व भागात एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या ओळखीच्या मैत्रिणीमार्फत काही तरुणांशी ओळख करुन देण्यात आली. या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे नराधमांनी पीडित मुलीचे अश्लील चित्रण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याप्रकरणी बजरंग दल तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बजरंग दलाकडून हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक
याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, या 14 वर्षीय मुलीशी माझी बातचित झाली. याबाबत मी पोलिसांसोबतही चर्चा केली. माझी मुख्यमंत्री तसेच पोलीस कमिशनर यांना विनंती आहे की या प्रकरणाचा तपास सीनियर अधिकाऱ्यांकडे द्यावा. हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार आहे कारण हे दोघांनी केलेले कृत्य असू शकत नाही. आरोपींच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या पाहिजेत तसेच यामागे मोठे षडयंत्र आहे त्याचाही तपास व्हावा.
तसेच “या नराधांनी अनेक मुलींना लुटलं असेल, यामध्ये चौघे असूच शकत नाहीत. यांनी आणखी किती मुलींसोबत अशी छेडछाड केली असेल? हे खूप मोठे कांड आहे. याप्रकरणी सुरुवातीला दोन्ही पोलिस ऑफिसर यांनी जो तपास केला आहे त्याचा मला प्रचंड वाईट वाटते. या पोलीस अधिकाऱ्यांवर लाज वाटते,” असं म्हणत सोमय्या यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
