बिझनेसमनच्या ‘त्या’ सिक्रेट रूममध्ये सापडला कोट्यवधींचा खजिना… चावी शोधता-शोधता अधिकाऱ्यांचं निघालं घामटं

आयकर विभागााने शहरातील एका ग्रुपवर टाकलेल्या छाप्यात सिक्रेट रूम सापडली. त्यामध्ये किलो-किलोने सोनं आणि कोट्यवधींची रोख रक्कम सापडली. मात्र त्याची चावी शोधताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले.

बिझनेसमनच्या त्या सिक्रेट रूममध्ये सापडला कोट्यवधींचा खजिना... चावी शोधता-शोधता अधिकाऱ्यांचं निघालं घामटं
| Updated on: Oct 09, 2023 | 4:19 PM

कानपूर | 9 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मयूर ग्रुपवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारलेल्या छाप्याचा (raid) चौथा दिवस आहे. या छाप्यात आत्तापर्यंत 12 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपच्या मालकाने एक सिक्रेट रूम तयार केली होती, ज्यामध्ये हा सर्व खजिना सापडला. कॅश आणि सोनं (cash and gold) ठेवलेल्या त्या सिक्रेट रूमचा फोटो समोर आला आहे. एका आलिशान खोलीच्या आतमध्ये ही सीक्रेट रूम तयार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी चावी शोधून ती रूम उघडली आणि आतील नजारा पाहून त्यांचे डोळेच विस्फारले.

त्या व्यावसायिकाने रूमची चावी एका कुंडीत लपवून ठेवली होती. ती शोधता शोधता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. शेवटी ती चावी शोधून भिंतीमध्ये आरशाच्या डिझाईनमध्ये घातल्यानंतर सिक्रेट रूमचा दरवाजा उघडला. या रूममधून 26 किलो सोनं (सुमारे 8 कोटी रुपये किंमत) आणि 4.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

यासोबतच या प्रकरणात 41 कोटी रुपयांची SAFTA फी चोरीही उघडकीस आली आहे. या संपूर्ण कारवाईत अनेक अनियमितता आणि करचोरी झाल्याचे उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 150 अधिकाऱ्यांनी 35 हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली, ज्यामध्ये एकूण 26.307 किलो वजनाचे दागिने सापडले. त्यापैकी 15.217 किलोग्राम जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत सुमारे 8 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 4.53 कोटी रुपयांची रोकड सापडली असून त्यापैकी 3.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

बंद खोलीची चावी शोधताना घामटं निघालं

या छाप्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, रोख रक्कम आणि सोनं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्व खोल्यांच्या चाव्या अशा ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या होत्या की, त्या शोधणं अधिकाऱ्यांसाठी खूपच कठीण होतं. ज्या खोलीत जास्तीत जास्त रोकड सापडली त्या खोलीची चावी एका कुंडीमध्ये लपवून ठेवलेली सापडली.

डाटा मेंटेन करण्यासाठी वापरलं हायटेक सॉफ्टवेअर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर ग्रुपने डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर केला. तो आता आयकर विभागाच्या फॉरेन्सिक टीमने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. जप्त केलेला लॅपटॉप आणि इतर उपकरणांचीही तपासणी करण्यात येत आहे.