
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका शिपायाच्या पत्नीने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिपायाची पत्नी सतत रडत होती आणि तिचा पती व सासरच्या लोकांचे काळे कारनामे उघड करत होती. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या…
ही महिला आहे बख्शी का तालाब (BKT) पोलीस ठाण्यात कार्यरत शिपाई अनुराग सिंह याची पत्नी सौम्या. सौम्या आणि अनुराग सिंह यांचं चार महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. पण लग्नानंतर काही काळातच सौम्याच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. अनुरागचे कुटुंबीय हुंड्यामुळे नाराज होते, कारण सौम्याने कोणताही हुंडा आणला नव्हता. यामुळे तिच्याशी गैरवर्तन केलं जात होतं.
शिपायाच्या पत्नीने केली आत्महत्या
या गोष्टींमुळे त्रस्त झालेल्या सौम्याने पंख्याला गळफास घेऊन स्वत:ला संपवले. आत्महत्येपूर्वी सौम्याने इंस्टाग्रामवर एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सौम्याने सांगितलं की, सासरच्या लोकांच्या दबावाखाली अनुराग तिला दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. एवढंच नाही, अनुराग अनेकदा सौम्याला मारहाण करायचा. सौम्याने व्हिडीओमध्ये म्हटलं, “वकिलाने माझ्या पतीला मला मारण्यास सांगितलं. त्याने सांगितलं की तो माझ्या पतीला वाचवेल.”
शिपायाच्या पत्नीचा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओमध्ये बोलताना ती रडताना दिसत आहे. सौम्याने इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितलं की, सासरचे लोक लग्नानंतर तिचा सतत छळ करत होते आणि याचमुळे तिला आत्महत्या करावी लागत आहे. आत्महत्येची घटना समजताच बीकेटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सौम्याच्या मृतदेहाचा ताबा घेतला. त्यानंतर सौम्याच्या माहेरच्या लोकांना माहिती देण्यात आली. तिचं माहेर मैनपुरी येथे आहे.
उत्तर लखनऊचे पोलीस अधिकारी जितेंद्र दुबे यांनी पुष्टी केली की, कॉन्स्टेबलच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं, “प्रभारी निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि कुटुंबीयांना माहिती दिली. एक क्षेत्रीय पथक बोलावण्यात आलं आणि फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.”