फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

| Updated on: Jan 13, 2022 | 4:11 PM

यूसूफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीचा रहिवासी आहे. तो फॅशन डिझाईनर होता. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याने चोरीची शक्कल लढवली आणि चार बाईक चोरल्या. चारही बाईकची खोटी कागदपत्रं तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून चारही बाईक विकल्या.

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड
फॅशन डिझाईनरने चक्क बाईक्स चोरल्या
Follow us on

कल्याण : लॉकडाऊनच्या काळात हाताला काम न राहिल्याने एक फॅशन डिझाईनर (Fashion Designer) चक्क बाईक चोर झाला. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivali) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यूसूफ खान या फॅशन डिझाईनरने चोरीच्या चार बाईक (Bike Theft) ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याही. चोरीला गेलेल्या बाईकचे चलान कापल्याने त्याचा मेसेज मूळ मालकाच्या मोबाईलवर गेला आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. ग्राहकांसोबतच त्याने चक्क आरटीओला सुद्धा फसवले आहे. अखेर मानपाडा पोलिसांनी बाईक चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीत बाईक चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करत होते. याचवेळी चोरीला गेलेल्या बाईकचे चलान कापल्याने त्याचा मेसेज मूळ मालकाच्या मोबाईलवर गेला. त्या व्यक्तीने याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली.

पुण्यातील व्यक्तीला बाईकची विक्री

मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. संबंधित बाईक पुण्याची एक व्यक्ती वापरत होती. जेव्हा पोलिसांचं पथक त्या व्यक्तीकडे गेलं, तेव्हा त्याने रितसर कागदपत्रं तयार करुन ही बाईक विकत घेतली असल्याचं सांगितलं. ओएलएक्सच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. समीर शेख नावाच्या व्यक्तीने ही बाईक विकल्याचे तो म्हणाला.

डोंबिवलीच्या फॅशन डिझाईनरकडून बाईकचोरी

दरम्यान, समीर शेख नावाची व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या मागे असणाऱ्या यूसूफ खानला पोलिसांनी शोधून काढले. यूसूफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीचा रहिवासी आहे. तो फॅशन डिझाईनर होता. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याने चोरीची शक्कल लढवली आणि चार बाईक चोरल्या. चारही बाईकची खोटी कागदपत्रं तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून चारही बाईक विकल्या. यूसूफ खान याने बाईक विकत घेणाऱ्यांचीच नाही, तर कल्याण आरटीओचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यूसूफ खानला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यूसूफने अजून किती बाईकची चोरी केल्यात, याचा तपास मानपाडा पोलिस करत आहेत.

दरम्यान, डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. यातील शाहरुख शेख नावाच्या चोरट्यांकडून पोलिसांनी 13 मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. शाहरुख हा गॅरेज चालवत होता. सर्व बाईक त्याने ठाणे शहरातून चोरी केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर मानपाडा पोलिसांनी सिद्धेश पांढरे नावाच्या एका रिक्षा चोराला सुद्धा अटक केली आहे. त्याच्याकडून एक रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


संबंधित बातम्या :

‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पगाराचा चेक का अडवला? महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा, अकाऊण्टंटवर वस्तू फेकल्या

लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, ठाण्याच्या तरुणांची मालवण ट्रीप अधुरी