भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं

उत्तर प्रदेशच्या पिलीभीत इथून धक्कादायक घटना समोर आली आहे. भावजयी आपल्या शेतात शौचास गेली म्हणून रागात एका दीराने आपल्या भावाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत आरोपीच्या भावाचा मृत्यू झाला.

भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं
प्रातिनिधिक फोटो

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या पिलीभीत इथून धक्कादायक घटना समोर आली आहे. भावजयी आपल्या शेतात शौचास गेली म्हणून रागात एका दीराने आपल्या भावाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत आरोपीच्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक व्यक्ती आपल्या भावासोबत इतकं निर्घृणपणे कसा वागू शकतो? असा सवाल उपस्थित केला जातोय. संबंधित घटना ही पूरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील कसगंजा गावात घडली आहे. याप्रकरणी मृतक व्यक्तीचा मुलगा मुनीश याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने सर्व घटनाक्रम सांगितला.

मृतकाच्या मुलाने तक्रारीत काय सांगितलं?

“आमच्या घरात शौचालय नसल्याने माझी 55 वर्षीय आई निर्मला देवी शनिवारी (28 ऑगस्ट) तलावाजवळ शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी तिथे गावातील काही नागरीक होते. त्यामुळे आई तलावाच्या शेजारी माझे काका बाबूराम (वय 60) यांचं शेत आहे. तिथे आई शौचास गेली. याच गोष्टीवरुन रागावलेल्या काका आणि त्यांच्या मुलांनी मिळून माझ्या वडिलांना मारहाण करत त्यांचा जीव घेतला”, असं मृतकाचा मुलगा मुनीश याने तक्रारीत म्हटलं आहे.

“विशेष म्हणजे काका बाबूराम आणि त्यांच्या मुलांनी त्याचदिवशी संध्याकाळी माझ्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची देखील धमकी दिली. काका आणि त्यांच्या मुलांचं तरीदेखील पोट भरलं नव्हतं. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या आईला पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर माझ्या वडिलांनी विषयाला पूर्णविराम देण्यास सांगितलं. पण काका आणि त्यांच्या मुलांनी माझ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या 70 वर्षीय वडिलांना इतकी मारहाण केली की ते प्रचंड जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला”, असे आरोप मुनीशने केले आहेत.

आरोपींना अटक, ते देखील जखमी

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी पक्षाचे माणसंही जखमी आहेत. आरोपी बाबूराम आणि त्याचा मुलगा राजीव हा देखील जखमी आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने घटनेमागे वेगळं कारण असल्याचं सांगितलं आहे. आपल्या काकांचा मुलगा मुनीश हा दारु पिवून घरातील गोष्टींमध्ये नाक खुपसतो. त्यावरुन वाद उफाळला, असं राजीवचं म्हणणं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

कोर्ट मॅरेज केलं, कुटुंबापासून लपवलं, दोनच महिन्यात नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून संपवलं

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI