आधी बलात्कार, मग शिक्षा, त्यानंतर स्वेच्छेने लग्न आणि फिरायला नेऊन हत्या, गुंतागुंतीची थरारक कहाणी

| Updated on: Jul 27, 2021 | 3:29 PM

लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची तक्रार गेल्या वर्षी 29 वर्षीय तरुणीने 24 वर्षीय तरुणाविरोधात केली होती. त्यानंतर तरुणाला शिक्षा झाली. मात्र आरोपीसोबत लग्न करणार असल्याचं सांगत तरुणीने तक्रार मागे घेतली. दोघांचं लग्न झालं. गेल्या महिन्यात नैनितालला फिरायला गेल्यानंतर तरुणाने तिची हत्या केली आणि ती पळून गेल्याचा बनाव रचला

आधी बलात्कार, मग शिक्षा, त्यानंतर स्वेच्छेने लग्न आणि फिरायला नेऊन हत्या, गुंतागुंतीची थरारक कहाणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : उत्तराखंडला फिरायला नेऊन 24 वर्षीय पतीने आपल्या 29 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नैनितालमधील उंच टेकडीवरुन धक्का देत विशालने रेवतीचा (दोघांची नावं बदलली आहेत) जीव घेतला. रेवती पळून गेल्याचं त्याने घरी येऊन सांगितलं. जून महिन्यात घडलेली ही घटना जवळपास महिनाभरानंतर उघडकीस आली. दाबरी पोलिसांचे पथक आता नैनितालमध्ये महिलेचा मृतदेह शोधत आहेत.

नेमकं काय घडलं?

वरकरणी साध्या सरळ दिसणाऱ्या या हत्येमागे अत्यंत गुंतागुंतीची कहाणी आहे. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची तक्रार रेवतीने गेल्या वर्षी म्हणजेच 14 जुलै 2020 रोजी पोलिसात केली होती. त्यानुसार विशालला 8 ऑगस्ट 2020 रोजी अटक झाली. त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. काही दिवसांनी रेवतीने पोलिसात प्रतिज्ञापत्र दाखल केले. आपल्याला बलात्काराची तक्रार मागे घ्यायची असून आरोपी विशालसोबत आपण लग्न करणार आहोत, असं तिने लिहिलं होतं. त्यानुसार 10 ऑक्टोबरला विशालला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकले.

भांडणानंतर रेवती माहेरी

आपली मुलगी रेवतीचं 7 जून रोजी विशालसोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. त्यामुळे ती माहेरी आली, असं रेवतीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. 11 जूनला विशालने तिला फोन केला आणि घरी परत येण्यास सांगितलं. पण रेवतीच्या आईने मुलीला सासरी पाठवण्यास नकार दिला. रेवतीला सासरी खाणं-पिणं दिलं जात नव्हतं, भांडणानंतर तिला धमकावलं जात असे, असं कारण तिने सांगितलं. मात्र विशाल रेवतीची समजूत काढण्यास यशस्वी झाला आणि तिला घरी घेऊन गेला.

उंच टेकडीवरुन धक्का देत हत्या

15 जूनला जेव्हा रेवतीशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विशालला संपर्क केला, तेव्हा रेवती नैनितालमधून पळून गेल्याचं त्याने सांगितलं, मीही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तिचा फोन स्वीच्ड ऑफ आहे, असं विशालने पोलिसांना सांगितलं. रेवतीच्या पालकांनी द्वारका कोर्टात अर्ज करत विशालविरोधात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता दोघांचे शेवटचे लोकेशन नैनितालमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तिथेच रेवतीचा फोन बंद झाला. पोलिसांनी विशालची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने उंच टेकडीवरुन धक्का देत हत्या केल्याची कबुली दिली. मात्र रेवतीचा मृतदेह शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

(Man pushes off wife in Nainital to death who alleged to rape her on pretext of marriage)