
शेवटचं माझ्या पप्पाचं तोंडही पाहू शकलो नाही हो…… हृदय भेदून टाकणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा हा आक्रोश आहे मृत मंगेश काळोखे यांच्या मुलांचा.. आमच्या वडिलांचा काय गुन्हा होती, की त्यांना इतक्या निर्दयीपणे मारलं असा सवाल विचारत मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी आर्त स्वरात काळोखे यांच्या मुलांनी केली असून त्यांच्या आक्रोसशाने सर्वांचेच डोळे भरून आले. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खोपोलीत घडलेल्या गुन्ह्याने ते शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं. खोपीलीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळेखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 26 डिसेंबर रोजी काळेखे हे त्यांच्या मुलाला शाळेत सोडण्यास गेले होते , तेथून परत येत असतानाच रसत्यालवर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून थेट हल्ला चढवला आणि वार करून काळोखे यांना संपवलं. यामुळे शहरात दहशतीचं वातावरण असून संपूर्ण राज्य हादरलं.
वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या..
त्यांच्या मृत्यूला 10 दिवस होत आले असून बाप हरपल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्यांच्या मुलांनी आज कुठे प्रतिक्रिया दिली आहे. काळोखे यांच्या दोन्ही मुलांना अश्रू अनावर झाले असून वडिलांचे शेवटचे दर्शनही नीट झाले नसल्याची व्यथा त्यांच्या आवाजात झळकत होती. ‘ आमच्या वडिलांचा काय गुन्हा होता, की त्यांना इतक्या निर्दयीपणे मारलं? ‘ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला आमच्या पप्पाचं शेवटचे दर्शनही झालं नाही, त्यांचं तोंडही पाहता आलं नाही असं म्हणत त्यांनी आक्रोश केला. आमच्या पप्पांना ज्यांनी मारलं त्या मारेकऱ्यांना मोक्का लावा आणि फाशी द्या, अशी मागणी शोकविव्हल मुलींनी केली. त्यांच्या आक्रोशाने सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. दरम्यान काळोखे यांच्या हत्येमागे सुधाकर घारे यांचा हात असल्याचा दावा देखील त्यांच्या पुतण्याने केला आहे.
हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस उलटच नाहीत तोच काळोखे यांची हत्या झाली. मंगेश काळोखे हे त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत होते, तेव्हाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ती घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. त्या फुटेजनुसार, मंगेश काळोखे यांचा हल्लेखोरांनी पाठलाग केला. काळोखे रस्त्यावर पडले, तेव्हा दोन-तीन जणांनी त्यांना घेरले. त्यानंतर 5-6 जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली. दगड, तलवारी आणि कोयत्याचा वापर करून हल्लेखोरांनी काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक परिसरात ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणात अनेकांची नावं समोर येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.