मनसुख हिरेन पट्टीचे स्वीमर, ते पाण्यात आत्महत्या करुच शकत नाहीत, निकटवर्तीयांचा दावा

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांना कुठलाही तणाव नव्हता.

  • कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 19:00 PM, 5 Mar 2021
मनसुख हिरेन पट्टीचे स्वीमर, ते पाण्यात आत्महत्या करुच शकत नाहीत, निकटवर्तीयांचा दावा
Mansukh Hiren

मुंबई : “मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांना कुठलाही तणाव नव्हता. ते चांगले स्विमर होते ते पाण्यात आत्महत्या करू शकत नाहीत, असा दावा मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी केला.  उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. (Mansukh Hiren cannot commit suicide claim close aid in Mukesh Ambani bomb scare case)

मात्र मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळला आहे. इतकंच नाही तर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार “यामागे नक्कीच घातपात आहे. त्यांची हत्या झाली असावी हा आमचा आरोप आहे. त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वर्गात शिकतात, जवळच्या सोसायटीत राहत असल्याने वारंवार भेट व्हायची. अंबानी स्फोटके प्रकरणात गाडी वापरल्यामुळे त्यांची मी विचारपूस केली होती. तर त्यांच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून ते दबावात न्हवते हे स्पष्ट होतं. आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात एक निष्पाप बळी गेलाय”.

हिरेन यांच्या मुलाचं काय म्हणणं आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन हे काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडले आणि ते परतलेच नाही. ते पायी घराबाहेर गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान एक ऑडिओ क्लिप हिरेन यांच्या मुलाची व्हायरल होते आहे. त्यानुसार हिरेन यांना पोहता येत होतं आणि ते आत्महत्या करण्याची शक्यताही कमी असल्याचही मुलगा म्हणतो. मित हिरेन असं मुलाचं नाव आहे. हा घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला

दरम्यान, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

मनसुख हिरेन काय म्हणाले होते?

गाडीचे मालक मनसुख हिरेन यांना क्राईम ब्रांचने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. माझी गाडी 17 तारखेला संध्याकाळी गाडीचे स्टेअरिंग जॅम झाले होते. मला मुंबईत तात्काळ एका कामासाठी यायचे होते म्हणून मी ऐरोली ब्रिजजवळ गाडी पार्क करून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी तिथे गेलो असता गाडी जागेवर नव्हती. मी गाडीचा तीन तास शोध घेतला. आरटीओने ताब्यात घेतली आहे का ते ही चेक केले. मात्र गाडी सापडली नाही म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांनी मीडियाशी बोलताना दिली होती.

कोण होते मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार-मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन गाला हे काल रात्रीपासून बेपत्ता होते . तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून राहात आहेत.

काल रात्रीपासून बेपत्ता

स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन गाला हे काल रात्रीपासून बेपत्ता होते

व्यवसाय- कार डेकोरेट आणि अॅक्सेसरीज -नौपाडा येथे दुकान होते

स्वतः स्वीमर होते आणि कॉप्लेक्समधील स्विमिंगपूलमध्ये त्यांच्या मुलांनादेखील पोहायला शिकवले

स्कूटरवर जास्त काळ प्रवास करत

संबंधित बातम्या 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला 

फडणवीस म्हणाले, कुणाला वाचवताय? गृहमंत्री म्हणाले, अर्णवला आत टाकला म्हणून वाझेंवर राग का?

Who is Sachin Vaze : अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?

(Mansukh Hiren cannot commit suicide claim close aid in Mukesh Ambani bomb scare case)