तो फोन येताच काळजात धडधड व्हायचं… तिच्यासाठी पोस्टाची आरडीही मोडली; आश्रुबाच्या मृत्यूनंतर कला केंद्रातील नर्तकीचा प्रताप समोर

धाराशिवमध्ये नर्तकीच्या प्रेमसंबंधातून २५ वर्षीय अश्रुबा कांबळे या विवाहित तरुणाने आत्महत्या केली. नर्तकी पूजा उर्फ आरतीसाठी त्याने लाखो रुपये खर्च केले, पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्याची पत्नीही सोडून गेली. अखेर त्याने गळफास लावून आयुष्य संपवले. ही आत्महत्या नसून पैशांच्या मागणीमुळे घडलेली हत्या असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे

तो फोन येताच काळजात धडधड व्हायचं... तिच्यासाठी पोस्टाची आरडीही मोडली; आश्रुबाच्या मृत्यूनंतर कला केंद्रातील नर्तकीचा प्रताप समोर
नर्तकीच्या प्रेमात तरूणाची आत्महत्या
| Updated on: Dec 10, 2025 | 2:40 PM

बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने काही दिवसांपूर्वीच अख्ख राज्य हादरलं होतं. नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी त्यांच्याच कारमध्ये गोळी झाडून स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. हे धक्कादायक प्रकरण अजून ताजे असतानाच आता धाराशीवमध्येही असाच भयानक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. धाराशीवच्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या 25 वर्षांच्या तरूणाने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं आणि एकच खळबळ माजली.

अश्रूबा अंकुश कांबळे असे त्या तरूणाचे नाव असून धक्कादायक गोष्ट म्हणजे तो विवाहीत होता, तरीही त्याचे नर्तकीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्याशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात त्याने पुढचा मागचा काही विचार न करता टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून घेत अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिच्यावर प्रेम होतं, तिच्यासोबतच देवदर्शनास तो गेला होता, फिरल्यानंतरही त्याने आयुष्य का संपवलं असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. याच प्रकरणाबद्दल आता रोज नवनवे अपडेट्स समोर येत असून अश्रुबा याच्या मृत्यूबद्दलही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नर्तकीच्या प्रेमात वेडा झाला, बायकोनेही सोडलं घर

मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा जाधव हा धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथे रहायचा. त्याचं लग्न झालं होतं, घरी बायकोही होती. तो येडशीजवळील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करायचा. मात्र काही अंतरावर असलेल्या साई कला केंद्रातील पूजा उर्फ आरती वाघमारे हिच्याशी त्याची ओळख झाली, हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. पाच वर्षांपासून त्यांचं नातं होतं.  विवाहीत असूनही त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं, तो समजावूनही ऐकेना, त्यातच प्रेयसी पूजा ही वारंवार त्याच्या घरीदेखील यायची. सतत वाद व्हायचे, अखेर या सर्वांला कंटाळून, त्याची पत्नी वैतागून घर सोडून माहेरी निघून गेली अशी माहिती सूत्रांनी दिली.

पैसे, सोनं दिलं, आरडीही मोडली, तरी हाव संपेना

त्यानंतरही पूजा आणि अश्रुबा यांच्यात वारंवार वाद व्हायचे, पैशांच्या मुद्यावरून भांडणं व्हायची. पूजा हिचा अश्रुबाला वारंवार फोन यायचा. ती त्याला सारखं कला केंद्रात बोलवायची, त्याच्याकडे पैशांसाठी सतत तगादा लावायची. त्याने तिला वेळोवेळी खूप पैसे दिले, घरातंलं सोन नाणं, रोख रक्कम दिली. एवढंच नव्हे तर त्याने तिच्यापायी त्याची आरडी मोडली आणि ते पैसेही तिला दिले, मात्र तिची हाव थांबेना. ती सतत त्याच्याकडे पैशांची मागणी करायची अशा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

अखेर याच सर्व भांडणांना , वादांना कंटाळून अश्रुबा याने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.  मात्र त्याची आत्महत्या नाही, ही तर हत्या आहे, असे म्हणत त्याच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नर्तकी पूजा हिला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.