आई नव्हे कसाई ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीला बेदम चोपलं, गळ्यावरही दिला पाय
Thane mother viral video : ठाण्यात एका महिलेने तिच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. स्टीलच्या रॉडने तिला चोप दिला. या अतिशय क्रूर कृत्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून तो पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल आणि डोळ्यांत अश्रू तरळतील.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! असं म्हणतात की ज्याच्याकडे आई आहे, त्याच्याकडे जगातलं सगळं काही आहे. आईचं प्रेम, माया, कौतुक, मुलांसाठी केलेली धडपड, मेहनत असे अनेक किस्से आपण ऐकतो. बाळाच्या भेटीच्या ओढीने गड उतरून गेलेल्या हिरकणीची कथा तर सर्वांना मुखोद्गत आहेच. आईच्या प्रेमाचं वर्णन शब्दांत करताच येत नाही. पण हीच आई एखाद्या कसायासारखी वागली तर ? प्रश्न वाचूनच अंगावर काटा आणि कपाळावर आठ्या आल्या ना !
आई हे प्रेमाचं दुसरं रूप असते असंत म्हणतात, मग ती कसायासारखी कशी वागेल ? पण ठाण्यातील एक महिलेचे कारनामे ऐकले आणि पाहिलेत ना तर ती आई नव्हे ही तर कसाई , असेच शब्द तुमच्याही ओठी येतील. ठाणे जिल्ह्यातील साबेगावमध्ये एक भयानक घटना घडली आहे. तेथे राहणाऱ्या एका महिलेने, एका आईने तिच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. आपलं मूल जरा पडलं, त्याला लागलं तरी आपला जीव वरखाली होतो, पण इथे तर त्या महिलेने स्वत:च तिच्या चिमुकल्या मुलीला चक्क स्टीलच्या रॉडने एवढा मार दिला की त्या मुलीचं अंग काळंनिळ पडलं. यशोदा ब्रह्मया गोडिमेटले असं त्या महिलेचं नाव आहे.
मोठ्या मुलीने शूट केला व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या जवळील साबेगाव येथे हाँ बयानक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार त्याच महिलेच्या मोठ्या मुलीने मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ती महिला तिच्या छोट्या मुलीला स्टीलच्या रॉडने मारते आहे, तिच्या अंगावर, गळ्यावरही पाय ठेवत्ये, हे त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते. आईच्या मारामुळे कळवळून ती मुलगी ओरडत होती, व्हिवळत होती. घरातले इतर लोकं त्या महिलेचा क्रूरपणा रोखण्याचा, तिला मारहाण करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्या महिलेला जराही दया आली नाहीच. तिने मारहाण सुरूच ठेवली. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येतो, हृदय हेलावून जाते, पण त्या महिलेला काही दया आली नाही, तिची मारहाण सुरूच होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले.
पोलिसांनी केली कारवाई
दिवा पोलिसांना या गंभीर कृत्याची घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपी महिला यशोदा गोडिमेटले हिला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तिचा जबाब नोंदवण्यात आला. मुलीच्या आजीने तिच्या सुनेविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी यशोदाविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ (२), ११८ (१) आणि ७५ (जे मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित आहे) यांचा समावेश आहे. महिलेला आता नोटीस बजावण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तर मारहाण झालेल्या त्या मुलीला आता उल्हासनगरच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, जेणेकरून ती सुरक्षित रहावी आणि तिच्यासोबत असे काहीही पुन्हा घडू नये.
