हनिमून कपलला काकीने ड्रग्ज प्रकरणात अडकवले, दाम्पत्य दोन वर्षांनी बाळासह कतारहून मुंबईला

मुंबईतील जोडप्याला कतार कोर्टाने जुलै 2019 मध्ये दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. (Mumbai Couple Qatar Drugs Case )

हनिमून कपलला काकीने ड्रग्ज प्रकरणात अडकवले, दाम्पत्य दोन वर्षांनी बाळासह कतारहून मुंबईला
कतारमध्ये अडकलेले दाम्पत्य ओनिबा आणि शरीक कुरेशी

मुंबई : कतारमध्ये हनिमूनसाठी जाताना ड्रग्ज प्रकरणात ‘बळीचा बकरा’ ठरलेले मुंबईतील दाम्पत्य अखेर मुंबईत परतले आहे. ओनिबा आणि मोहम्मद शरीक कुरेशी तब्बल दोन वर्षानंतर मायदेशी आले. तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह त्यांची घरवापसी झाली. या दाम्पत्याला कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने केलेल्या प्रयत्नाने त्यांची आता सुटका झाली. (Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail in alleged Drugs Case return India with help of NCB)

कतारमधील दोहा विमानतळावर सामानामध्ये 4.1 किलो चरस सापडल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील जोडप्याला जुलै 2019 मध्ये दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी गर्भवती असलेल्या ओनिबाने दरम्यानच्या काळात कारागृहातच बाळाला जन्म दिला होता. अखेर 3 फेब्रुवारीला या दाम्पत्याची निर्दोष सुटका झाली.

एनसीबीच्या प्रयत्नांनी जोडप्याची सुटका

मुंबईतच राहणाऱ्या मोहम्मदच्या काकीने जोडप्याला हनिमून टूर भेट दिली होती. कतारला जातच आहात, तर माझ्या नातेवाईकांना भेटवस्तू द्या, असे सांगून काकीने एक पाकीट दिल्याचा दावा जोडप्याने केला होता. एनसीबीने या प्रकरणात लक्ष घालून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

कतारमधील कायदे ड्रग्ज प्रकरणात कठोर

कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात निर्दोष सुटका होणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाची सर्व तपासणी करुन संबंधित सर्व पुरावे कतारच्या सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवले. त्यानंतर यावर निर्णय सुनावताना कतारच्या न्यायालयाने हे दाम्पत्य निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले.

नेमकं प्रकरण काय?

मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा या भारतीय प्रवाशांना 6 जुलै 2019 रोजी कतारमधील दोहा इथल्या हमद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज अंमलबजावणी पथकाने पकडले होते. दाम्पत्याच्या सामानातून 4.1 किलो चरस ताब्यात घेण्यात आले होते. शरीक आणि ओनिबा यांच्यावर कतारमध्ये खटला चालवण्यात आला. दोषी आढळल्याने दोघांना दहा वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी तीन लाख रियाल (अंदाजे 60 लाख रुपये) दंड सुनावण्यात आला. (Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail in alleged Drugs Case return India with help of NCB)

ओनिबाचे वडील शकील कुरेशी यांनी 27 सप्टेंबर 2019 रोजी एनसीबीकडे तक्रार केली होती. ओनिबा आणि शरीक निर्दोष आहेत. शरीकची काकी तबस्सुम रियाझ कुरेशी आणि तिचा सहकारी निजाम कारा यांनी दोघांना फसवल्याचा आरोप त्यांनी केला. हनिमून पॅकेजच्या आमिषाने दोघांना कतारला पाठवले आणि त्यांना सीलबंद पाकीट नेण्याची गळ घातली, असा दावा कुटुंबाने केल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनी दिली.

शकील कुरेशी यांनी तक्रारीसह संबंधित कागदपत्रे, शरीक आणि काकी तबस्सुम यांच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग असलेली कॉम्पॅक्ट डिस्क एनसीबीला दिली. शकील कुरेशी यांनी केलेल्या आरोपांची एनसीबीतर्फे सविस्तर चौकशी करण्यात आली. तबस्सुम आणि इतरांचा सहभाग असलेले सुनियोजित ड्रग्ज तस्करी रॅकेट सुरु असल्याचे तपासात समोर आले.

संबंधित बातम्या :

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती

(Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail in alleged Drugs Case return India with help of NCB)

Published On - 7:34 am, Thu, 15 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI