ठाकरे गटाला मोठा धक्का ! मुख्यमंत्र्यांचा कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल विधानसभेत इशारा; आज किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा

मुंबई महापालिकेतील कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर आता थेट मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का !  मुख्यमंत्र्यांचा कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल विधानसभेत इशारा; आज किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा
किशोरी पेडणेकर यांना अंतरिम दिलासा कायम
| Edited By: | Updated on: Aug 05, 2023 | 12:59 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर आता थेट मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत इशारा देताना कुणालाच सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज हा गुन्हा दाखल झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रापाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर या महापौर असताना हा हा घोटाळा झाला होता. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन हजाराची बॉडी बॅग…

बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यांचा हा विरोध डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच आज आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पूर्वी किशोरी पेडणेकर यांनी मी ईडीच्या रडारवर नसल्याचं म्हटलं होतं.

त्यांना सोडणार नाही

दरम्यान, विधानसभेतही कोव्हिड घोटाळ्याचा मुद्दा गाजला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार पाचशे रुपयांची बॉडी बॅग सहा हजार रुपयांना विकत घेण्यात आल्याचं सांगितलं. कोव्हिडमध्ये आपण काम करत होतो. लोकं मदत करत होते. त्यावेळी लोकं मरत होते आणि काही लोक पैसे बनवत होते. हे दुर्देव आहे. यामध्ये जो घोटाळा केला आहे, त्यांना बिलकूल सोडलं जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

लाईफ लाईन की डेडलाईन हॉस्पिटल. माणसांना मारणारं हॉस्पिटल होतं ते. आपल्याच लोकांना कंत्राट दिलं. ज्यांना अनुभव नाही, त्यांना काम दिलं. त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते. पण डॉक्टर असल्याचं दाखवून पैसे कमावले, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी काल विधानसभेत हा आरोप करताच आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.