अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक

मेडिकल कौन्सिलिंग आणि केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालात डॉ. कोटा यांच्याकडे केवळ एमबीबीएस डिग्री असून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक एमएस पदवी नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नसल्याचंही अहवालात सांगण्यात आलं

अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : आवश्यक पदवी नसतानाही एमबीबीएस डॉक्टरने मूळव्याधीच्या जवळपास एक हजार शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. टॅक्सी चालकावर केलेली मूळव्याधीची शस्त्रक्रिया फसल्यानंतर डॉक्टरचा बनाव उघडकीस आला. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉ. मुकेश कोटा (Dr Mukesh Kota) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. कोटा दादरसारख्या गजबजलेल्या भागात दवाखाना चालवत होता. (Mumbai Unqualified MBBS Doctor arrested for performing piles surgeries)

नेमकं काय घडलं?

गोरेगावमध्ये राहणाऱ्या संबंधित 43 वर्षीय टॅक्सी चालकाला मूळव्याधीचा त्रास जाणवत होता. चौकशी केल्यानंतर त्याला दादर टीटी भागातील गोपालराव पाईल्स सेंटरबाबत माहिती मिळाली. मूळव्याधावर विनाशस्त्रक्रिया उपचार करण्याबाबत या क्लिनीकची जाहिरात मुंबईत अनेक ठिकाणी त्याला दिसली.

शस्त्रक्रियेनंतर टॅक्सी चालकाला रक्तस्राव

तक्रारदार टॅक्सी चालकाने 20 फेब्रुवारी रोजी पत्नीसह डॉ. कोटाची भेट घेतली. ड्रेसिंग केल्यानंतर डॉक्टरने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगून डॉक्टरने त्याच्यावर ऑपरेशन केलं आणि 25 हजार रुपये घेतले. घरी जात असताना शस्त्रक्रिया केलेल्या जागी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचं तक्रारदाराला दिसलं. त्यामुळे पत्नीने त्याच्यासह थेट केईएम रुग्णालय गाठलं. केईएममध्ये उपचार झाल्यानंतर टॅक्सी चालकाने माटुंगा पोलिसात लेखी तक्रार दिली.

डॉक्टरकडे पदवी नसल्याचं स्पष्ट

मेडिकल कौन्सिलिंग आणि केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालात डॉ. कोटा यांच्याकडे केवळ एमबीबीएस डिग्री असून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक एमएस पदवी नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नसल्याचंही अहवालात सांगण्यात आलं. त्यानुसार माटुंगा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

दादरमध्ये क्लिनीक उघडून तीन वर्षात डॉ. कोटाने एक हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. त्यामुळे आणखी काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

ना व्हेंटिलेटर, ना अद्यावत सुविधा, शिकाऊ डॉक्टरांमुळे 87 रुग्णांचा मृत्यू, सांगलीत रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरला अटक

लग्न मोडले, परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल, आरोपी डॉक्टर अटकेत

(Mumbai Unqualified MBBS Doctor arrested for performing piles surgeries)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI