मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 6000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला आणि सध्या फरार असलेला मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयने नव्याने दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे चोक्सीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, कायदेशीर कारवाईचा फास आणखीन आवळला आहे. सीबीआयने चोक्सी आणि गीतांजली रत्न नक्षत्र ब्रांड विरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत. सीबीआयने चोक्सीला दिलेला हा मोठा झटका मानला जात आहे. 55.27 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने हे गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून हे गुन्हे दाखल केल्याची माहिती सीबीआयमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.