अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकललं, तरूणाचा थेट अंगठाच कापला, कुठे घडला भयानक प्रकार ?
मुंबईच्या जुहू चौपाटीवर एका कुत्र्याला हाकलण्याच्या निमित्ताने घडलेल्या भयानक घटनेत २६ वर्षीय तरूणाचा अंगठा कापला गेला. ओमकार मुखिया नावाच्या आरोपीने रागातून चाकूने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला अटक केलीआहे. घटना अतिशय क्रूर असून तिने सर्वांना हादरवले आहे.

अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकललं, म्हणून राग आल्याने एका 26 वर्षांच्या तरूणाचा अंगठाच कापून टाकल्याची अतिशय क्रूर आणि भयानक घटना घडली आहे. मुंबईतील जुहू चौपाटीवर घडलेल्या या प्रकाराने सगळेच हादरले आहेत. एवढंच नव्हे तर आरोपीने तक्रारदार व्यक्तीवर चाकूनेही वार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अर्जुन कैलास गिरी (वय 26) असे तक्रादार तरूणाचे नाव आहे. तर ओमकार मनोहर मुखिया ऊर्फ ओमकार शर्मा असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन गिरी हा रविवारी त्याच्या मित्रासह, रामसिंह राजपूत याच्यासोबत जुहू चौपाटीवर गेले होते. तेथे बराच वेळ फिरून झाल्यानंतर ते घरी जात असताना बिर्ला लेन येथे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका टपरीवरील कुत्रा भुंकत अचानक गिरी यांच्या अंगावर आला. त्यामुळे घाबरलेल्या अर्जुन गिरी यांनी शेजारीच असलेली सलेली खुर्ची उचलली व कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रकार पाहून आणि कुत्र्याला हाकलवत असल्यामुळे तेथेच असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला खूप राग आला. त्याने गिरी यांना थेट धक्काबुक्की केली.
एवढंच नव्हे तर आरोपी हा तेथील खाद्यपदार्थांच्या टपरीवरे गेला आणि त्याने तेथून थेट चाकू उचलला. त्या चाकूने त्याने गिरी यांच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. या प्रकारात अर्जुन गिरी यांच्या डाव्या हाताचा अर्धा अंगठा कापला आणि भळाभळा रक्त वाहू लागलं. यानंतर त्याच्या मित्रासह इतरांनी तातडीने त्यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेची माहिती जुहू पोलिसांना देत तक्रार नोंदवण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 109, 352 शस्त्र अधिनियम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून आरोपी तरूणाला शोधून काढलं आणि त्याला बेड्या ठोकून अटक केली. ओमकार मनोहर मुखिया ऊर्फ ओमकार शर्मा असे आरोपीचे नाव असून पोलिस अधिक तपास करत आहेत.