व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैसे गमावले, युवकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

| Updated on: Nov 07, 2021 | 3:32 PM

आपली रोजची मिळकत सुद्धा हातची गेल्याने त्याने या नैराश्यातून तिथेच विषारी औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पोलीस विभागाच्या दालनात जाऊ नये यासाठी युवकाला दवाखान्यात नेल्याची माहिती आहे.

व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैसे गमावले, युवकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
वाशिममध्ये व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैसे गमावल्याने तरुणाचे विष प्राशन
Follow us on

वाशिम : आजच्या काळात अनेक जणांना एका रात्रीत मालामाल होऊन धन दांडग्यांच्या पंक्तीत बसण्याची इच्छा असते. यासाठी वाशिमच्या कारंजा तालुका स्तरावर काही जणांनी व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली आपली दुकानदारी थाटली आहे. नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. तर काही नागरिक सुद्धा रुपयाला दहा रुपये या प्रमाणे आपण सुद्धा पैशाच्या या डावात मालामाल कसे होऊ, या हव्यासातून स्थानिक व्हिडीओ गेम पार्लरच्या प्रलोभनाला बळी पडत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मशीनवर कॉईन्सच्या माध्यमातून वरली-मटकाप्रमाणे आकडेमोड करत दामदुप्पट पैसे कमवण्याच्या नादात आपली रोजची मिळकत डावावर लावून कंगाल होताना दिसत आहे. 5 नोव्हेंबर रोजी स्थानिक गवळीपुरा येथील रहिवाशी युवकाने आपली रोजची मिळकत या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये हरल्याने नैराश्यातून आपले आयुष्यच या व्हिडीओ गेम पार्लरच्या डावावर लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

कारंजा शहरातील स्थानिक शिवाजी नगर परिसरातील हनुमान मंदिराच्या समोरील संकुलामध्ये राधाकृष्ण व्हिडिओ गेम पार्लर आहे. इथे लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनवर आपले नशीब आजमवण्यासाठी गवळीपुरा येथील युवक येऊन कॉईन्सच्या माध्यमातून आकडेमोड करत डावावर खेळत होता. आपली रोजची मिळकत सुद्धा हातची गेल्याने त्याने या नैराश्यातून तिथेच विषारी औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

दुकान मालक कृष्णा देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या मनोरंजन विभागा शिवाय पोलीस विभागाच्या दालनात जाऊ नये यासाठी युवकाला दवाखान्यात नेल्याची माहिती आहे. या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये चौधरी नावाचा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांची सुद्धा भागीदारी असल्याची चर्चा आहे.

कागद शासन मान्यतेचा मात्र कारभार अमान्यतेचा

कारंजा शहरात मनोरंजनाच्या नावाखाली शासन मान्यता प्राप्त अनेक व्हिडिओ गेम पार्लर अनुज्ञप्ती उदयास आल्या आहेत. यामध्ये, शासनाने या अनुज्ञप्तीला परवाने बहाल करताना अनेक निकषांचे जाळे विणले आहे. मात्र, या अनुज्ञप्ती च्या नावाखाली अनेक मालक अवैधरित्या काम करीत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

तर, अशा या आयुष्याचे डाव उद्ध्वस्त करणाऱ्या व्हिडिओ गेम पार्लरचे परवाने रद्द करण्यात यावे. अशी मागणी जोर धरत आहे. जेणेकरून भावी पिढीचे आयुष्य या लुकलुकत्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनच्या डावावर लागणार नाही. याकरिता, स्थानिक महसूल विभागाच्या अंतर्गत असणारे मनोरंजन विभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या

भारत-पाक युद्धात सहभागी नांदेडच्या माजी सैनिकाचा खून, मुलगा-सून-नातवाने संपवलं

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक