Nashik Wedding Theft | लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

Nashik Wedding Theft | लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला
इगतपुरीत लग्नसोहळ्यातून नववधूचे दागिने चोरीला

नाशिक : इगतपुरीतील केपटाऊन व्हिलाज् रिसॉर्ट नेहमीच वेगवेगळ्या घटनांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. नुकतेच एका व्यापाऱ्याच्या पुतणीच्या लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडली. नववधूची सहा लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. हा चोरटा लग्नातील फोटोमध्ये कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

केपटाऊन व्हिलाज हे रहिवासी संकुल आहे. या ठिकाणी रिसॉर्टची परवानगी नसतानाही पर्यटकांना भाडे तत्त्वावर लॉजिंग किंवा लग्न समारंभासाठी ऑनलाईन बुकिंग दिले जाते, अशी स्थानिकांची ओरड आहे. असं असताना मंगळवारी घोटी येथील व्यापाऱ्याच्या पुतणीचा लग्न सोहळा या केपटाऊन व्हिलाजमध्ये सुरु होता.

नेमकं काय घडलं?

यावेळी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास 6 लाख 11 हजार रुपये किमतीचे वधूचे सोन्याचे दागिने असलेली बॅग उचलून अज्ञात व्यक्तीने पलायन केले. या घटनेबाबत नवऱ्या मुलीचे काका ताराचंद केवलचंद बबेरवाल (वय 45 वर्ष, रा. घोटी) यांनी चोरीच्या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दागिन्यांच्या थैलीसह चोरटा पसार

फिर्यादीत म्हटले की पुतणीचे लग्न सोहळा सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती व्यासपीठावर तोंडाला मास्क लावून चोरीच्या तयारीने आला. कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून दागिने असलेली बॅग घेऊन तो निघून गेला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आणि लग्न समारंभातील फोटो शूटिंगमध्ये या इसमाच्या हालचाली कैद झाल्या आहे.

दागिन्यांची बॅग चोरी करणारी व्यक्ती अनोळखी असून लग्न सोहळयात तो स्वतःहून घुसला, की त्याला बोलावला होता, या बाबत उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. या ठिकाणी याआधीही अनेक पर्यटकांच्या लहान मोठया चोऱ्या झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेचा अधिक तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार जाधव आणि पोलीस हवालदार विजय रुद्रे, खिलारे आदी करत आहेत.

संबंधित बातम्या :

मालेगावमध्ये डॉक्टरचे घर फोडले, 12 लाखांची चोरी; माणिक-मोती, हिरे, हिरव्या पाचूच्या दागिन्यांवर डल्ला

नाशिककरांनो, कोणती प्लास्टीक पिशवी वापरताय; अन्यथा होऊ शकतो 25 हजारांचा दंड, 3 महिने जेलही

अंबड औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, शेड तोडून ट्रक थेट शेतात; चालकाचा जागीच मृत्यू

Published On - 8:30 am, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI