नाशकातील हत्येचं गूढ उकललं, 20 रुपयांसाठी गळा चिरुन मजूराचा खून

| Updated on: Sep 12, 2021 | 10:34 AM

मारेकऱ्यांनी तरुणाचा गळा चिरला होता. त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. तेव्हा त्यांना जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज बाहेर रक्ताचे पडलेले डाग आणि काही कपडे दिसले.

नाशकातील हत्येचं गूढ उकललं, 20 रुपयांसाठी गळा चिरुन मजूराचा खून
नाशकात तरुणाची हत्या
Follow us on

नाशिक : नाशिकच्या पंचवटीमध्ये काल झालेल्या निर्घृण खुनाचा पोलिसांनी छडा लावला आहे. अवघ्या 20 रुपयांसाठी या आरोपीने धारदार कट्याराने गळा चिरुन मजुराची हत्या केल्याचा आरोप आहे. ऐन गणेशोत्सवात झालेल्या हत्येमुळे नाशकात एकच खळबळ उडाली होती.

काय आहे प्रकरण?

संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. संशयित आरोपी पंडित गायकवाडला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

एका अज्ञात तरुणाचा मारेकऱ्यांनी गळा चिरल्याची घटना शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री उघड झाल्याने खळबळ उडाली होती. जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज खाली ही घटना घडली. यामुळे पोलिस खातेही हादरून गेले होते.

नेमकं काय घडलं?

एका अज्ञात तरुणाचा मारेकऱ्याने पाठलाग सुरू केला. तेव्हा त्याने जीवाच्या आकांताने धावतपळत काट्या मारुती पोलिस चौकीजवळचा पेट्रोल पंप गाठला. तेथून पुढे असलेल्या संघवी मिलसमोर बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अर्ध्या किलोमीटरपर्यंत रक्ताचे डाग

मारेकऱ्यांनी तरुणाचा गळा चिरला होता. त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. तेव्हा त्यांना जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज बाहेर रक्ताचे पडलेले डाग आणि काही कपडे दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. तेव्हा त्यात पंपावर एक व्यक्ती हात धुत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीची चौकशी करून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

तपोवनातील उद्यानात सापडला

पोलिसांनी संशयिताचा रामकुंड, झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, गोदाघाट परिसरात शोध घेतला. तेव्हा पंडित रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या हा तपोवनातील एका उद्यानात सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हाच्या कबुली दिली.

संशयित पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या (वय 32) यानेच मृताचा कटरने गळा चिरल्याचे उघड झाले. आरोपीच्या नावावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मृताचे नाव सुनील आहे. पोलिसांना त्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही.

नागरिकांमध्ये घबराट आणि संताप

दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या :

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगर हादरलं, रेल्वे स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?

‘हॅलो, तुझा मुलगा आमच्या ताब्यात, सुखरुप हवा असेल तर 40 लाख दे’, फोनवर धमकी, पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या