धावत्या रिक्षात रागवलेल्या पतीचं पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य, पत्नीवर आभाळ कोसळलं, अख्ख नाशिक हळहळलं
नाशिकच्या तपोवन परिसरात एका पतीने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर आत्महत्या केली. चेतक पवार नावाच्या या तरुणाने रिक्षेतून प्रवास करताना उड्डाणपुलावरून उडी घेतली. घटनेनंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. आडगाव पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि कौटुंबिक वाद हे आत्महत्येचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस पत्नी आणि इतर साक्षीदारांची चौकशी करत आहेत.

संसार म्हटलं की कायमच वाद, भांडण, मतभेद हे होत असतात. त्यात नवरा-बायकोमध्ये तर छोट्या मोठ्या गोष्टींवर नेहमीच वाद होत असतात. पण हे वाद कधी टोकाला जातील आणि होत्याचं नव्हतं होईल, याचा काहीच नेम नाही. नाशिकच्या तपोवन परिसरात एका पतीने पत्नीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीसोबत रिक्षाने प्रवास करत असताना पतीने उड्डाणपुलावरुन उडी घेत जीवन संपवलं. चेतक पवार असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
चेतक पवार आणि त्याच्या पत्नीचा काही कारणांनी वाद झाला. या वादानंतर ते दोघेही एकत्र रिक्षातून प्रवास करत होते. रिक्षा एका उड्डाणपुलावर आल्यावर अचानक चेतकने चालत्या रिक्षातून पुलावरुन उडी घेतली. तो खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याची पत्नी उड्डाणपुलावरुन खाली आली आणि ती जोरजोरात रडायला लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर आजूबाजूला असलेल्या वाहनचालकांनी गर्दी केली.
यानंतर ज्या रिक्षात बसून चेतक पत्नीसोबत प्रवास करत होता, त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसेच चेतकने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरु
सध्या आडगाव पोलिसांकडून चेतकच्या आत्महत्येचा तपास केला जात आहे. चेतकच्या आत्महत्येच कौटुंबिक वाद हेच कारण आहे की अन्य काही याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आज चेतकची पत्नी आणि कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवले. त्याशिवाय ज्या रिक्षातून चेतकने उडी घेतली, त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत काय निष्पन्न झालं याची माहिती समोर आलेली नाही.
