Crime News : अजब चोर की गजब कहानी.. विमानाने यायचा, चोरी करून फरार व्हायचा, 12 लाख…
चोरी करण्यासाठी थेट विमानाने येणाऱ्या एका अतरंगी चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी करून तो दागिने विकायचा आणि पुन्हा घरी परतायचा..

कानून के हात बहोत लंबे होते है… आपण सर्वांनीच हे वाक्य कधी ना कधी ऐकलं असेलच. त्याचा प्रत्यय गुन्हेगारांना कधीतरी येतोच. असंच काहीसं नवी मुंबईतही घडलं आहे. तिथे पोलिसांनी एका अशा अनोख्या, अतरंगी चोराला पकडलं आहे, की जो चोरी करण्यासाठी चक्क विमानाने यायचा, चोरी करून माल विकायचा आणि पुन्हा विमानानेच निघून जायचा. बऱ्याच दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते, पण तो हाती लागत नव्हता, अखेर अथक प्रयत्नांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून (Crime News) त्याच्याकडून तब्बल साडेबारा लाखांचा मुद्देमाल, सोन्या-चांदीचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम असे आरोपीचे नाव असून तो आसामच्या होजाई जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एका अतिशय धूर्त, क्रूर आणि व्यावसायिक चोर असून त्याने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमध्ये(MMR) आतापर्यंत 33 चोरी केल्याची कबुली दिली आहे.
अशी करायचा चोरी
चोर असला तरी तो अतरंगी होता. तो चोरीसाठी आसामहून विमानाने मुंबईला यायचा. शहरात आल्यावर तो एखाद्या स्वस्त वसतीगृहात किंवा लॉजमध्ये थांबायचा. त्यानंतर तो आसपासच्या भागातील बंद घरांची रेकी करायचा. मनासारखी संधी मिळाली की तो एखाद्या घरात घुसून तिथले मौल्यवान दागिने, पैसे आणि मोलाच्या वस्तू वगैरे चोरून पळ काढायचाय. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याच्याकडून 12.57 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. अलिकडेच त्याने नेरुळ पोलीस क्षेत्रात 4 तर आणि रबाळे पोलीस क्षेत्रात 1 चोरी करत हात साफ केला होता.
चोरी नंतर व्हायचा सोनार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी केल्यानंतर मोइनुल हा त्याची ओळख लपवण्यासाठी सोनार (ज्वेलर) बनायचा. चोरी केलेले दागिने तो स्थानिक बाजारात नेऊन त्याच्या बदल्यात रोख रक्कम घ्यायचा आणि मग विमानाने तो पुन्हा आसामला परतायचा. 4 सप्टेंबर रोजी नेरुळ येथील साई-छाया भवनमध्ये झालेल्या मोठ्या चोरीनंतर,पोलीस त्याचा कसून शोध घेत होते, अखेर त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. सुमारे 4.95 लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
अनेक गुन्हे दाखल
त्याल अटक केल्यावर करण्यात आलेल्या चौकशीत बरीच धक्कादायक माहिती समोर आली. यापूर्वीही मोइनुल याच्याविरोधात नवी मुंबईत 11 आणइ ठाणे पोलिस आयुक्तालयात 22 गुन्हे दाखल आहेत. तो बऱ्याच काळापासून चोरी करत असल्याचे यामुळे समोर आले आहे. सध्या, पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत , तो एकटाच काम करत होता की एखाद्या टोळीचा भाग होता हेही पोलिसांकडून शोधण्यात येत आहे. त्याची चोरीची ही पद्धत खूपच अनोखी आणि धक्कादायक आहे, कारण आतापर्यंत कोणत्याही चोराने विमानातून येऊन चोरी केल्याचे आणि नंतर तसेच परत गेल्याचे ऐकले नव्हते असे पोलिसांनी सांगितलं.
