पुण्यातील मराठी अभिनेत्रीचा गोव्यात मृत्यू, मित्रासह फिरायला जाताना कार खाडीत कोसळली

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर गेली आणि तिथून खाडीत पडली. गाडी सेंट्रल लॉक झाल्यामुळे दोघांना कारबाहेर पडता न आल्याचा अंदाज आहे.

पुण्यातील मराठी अभिनेत्रीचा गोव्यात मृत्यू, मित्रासह फिरायला जाताना कार खाडीत कोसळली
पुणेकर पर्यटकांचा गोव्यात अपघाती मृत्यू

पुणे : पुण्यातील नवोदित अभिनेत्रीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची दुर्दैवी अखेर झाली. गोव्यात फिरायला गेलेल्या पुणेकर तरुणी आणि तिचा मित्राचा अपघाती मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील अरपोरा भागातील खाडीत कार कोसळून सोमवारी सकाळी त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये पुण्याची रहिवासी असलेली 25 वर्षीय अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा 28 वर्षीय मित्र शुभम देडगे यांचा करुण अंत झाला.

नेमकं काय घडलं?

गोव्यात बारडेझ तालुक्यातील अरपोरा म्हणजेच हाडफाडे गावाजवळ सोमवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर गेली आणि तिथून खाडीत पडली. गाडी सेंट्रल लॉक झाल्यामुळे दोघांना कारबाहेर पडता न आल्याचा अंदाज आहे. सात वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्यातून गाडी आणि दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

आदल्या रात्री क्लबमध्ये गेल्याचा अंदाज

दोघांच्या हातामध्ये रिस्टबँड आढळले आहेत. त्यामुळे अपघाताच्या आदल्या रात्री ते एखाद्या क्लबमध्ये गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. शुभम देडगे हा पुण्यातील कीर्कतवाडी भागातील रहिवासी होता, तर ईश्वरी देशपांडेही पुण्यात राहायची. दोघांच्याही कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिल्यानंतर ते गोव्याला यायला निघाले.

मराठी-हिंदी चित्रपटात अभिनय

दरम्यान, ईश्वरी देशपांडे हिने एका मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्याची माहिती आहे. या सिनेमांचे चित्रिकरण पूर्ण झाले होते, मात्र स्वतःचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगोलीत कार खड्ड्यात कोसळून चार शिक्षकांचा मृत्यू

याआधी, हिंगोलीतील राज्य महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातामध्ये चौघा जणांना प्राण गमवावे लागले होते. सेनगावनजीक जून महिन्यात रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असल्याने सेनगाव जिंतूर रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळल्याचं समोर आलं होतं.

पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे भरधाव कार वेगाने जाऊन खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडल्यानंतर लगेच लॉक झाली. पाण्यात बुडालेल्या गाडीतून बाहेर पडता न आल्यामुळे चारही जणांचा गाडीतच गुदमरुन करुण अंत झाला.

दुचाकीस्वारामुळे घटना उघड

ही कार खड्ड्यात कोसळल्यानंतर बराच वेळ कोणालाही पत्ता लागला नव्हता. काही वेळानंतर एक दुचाकीस्वार याच मार्गावरुन जात होता. त्यावेळी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्याला कारच्या हेडलाईटचा प्रकाश दिसला. तेव्हा या दुचाकीस्वाराने जवळच्या एका धाब्यावर जाऊन या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि कारमधील चौघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. चौघेही लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी होते.

संबंधित बातम्या:

कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, गाडी लॉक झाली, पाण्यात बुडून चौघांचा अंत

पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला, कार वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, चिमुरडा बेपत्ता, पती बचावला

ज्या पुलामुळे आधी 4 शिक्षक गुदमरुन मेले, तिथंच आता पुन्हा दोन दुचाकीस्वार गेले, नेमकं काय घडलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI