पुण्यात चालले काय? तीन दिवसांत तीन गोळीबार, हे पुणे आहे की आणखी…
Pune Crime News: पुणे येथील उरूळी कांचन भागात गोळीबाराची घटना घडली. बापू शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केला होता. त्यात काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले होते. आता पुणे शहरातील कोंढव्यात गोळीबाराची घटना सोमवारी घडली.
पुणे शहरात काय चालले आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. देशाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांत तीन गोळीबार झाले आहेत. पुणे शहरात सोमवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. पुण्यातील कोंढव्यात गोळीबाराची ही घटना आहे. वाळू व्यवसायिकावर हा गोळीबार झाला आहे. या प्रकरणांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाळू व्यावसायिक दिलीप गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. कोंढवा परिसरातील साळवे नगरमध्ये सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहे. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढली
पुणे शहराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीमुळे होऊ लागली आहे. पुण्यात गोळीबार, कोयत्या हल्ले, हत्या, दरोडे या घटना वाढत आहे. त्यावर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाही आवाज उठवत आहे. आता गेल्या तीन दिवसांपासून गोळीबाराच्या घटना उघड आहे. यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले निघत आहेत. पुण्यात पोलीस आहेत का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
सांबेरवाडी, उरळी कांचननंतर आता कोंढव्यात गोळीबार
दोन, तीन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळ असलेल्या सांबरेवाडी येथे दोन गटामध्ये गोळीबार झाला होता. खडकवासला धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांबरेवाडी गावामध्ये गोळीबार शनिवारी झाला होता. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या प्रकारात एकाच जागीच मृत्यू होता. तर दुसरा गंभीर होता.
त्यानंतर पुणे येथील उरूळी कांचन भागात गोळीबाराची घटना घडली. बापू शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केला होता. त्यात काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले होते. आता पुणे शहरातील कोंढव्यात गोळीबाराची घटना सोमवारी घडली. त्यामुळे हे पुणे शहर आहे की आणखी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.