Vaishnavi Hagawane Death Case : बाप शेतकरी, लेकीचे प्रेमसंबंध समजताच…वैष्णवी हगवणे-शशांकच्या लव्ह मॅरेजची दुर्दैवी कहाणी काय?
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. तिने लव्ह मॅरेज केले होते. मात्र सासरच्या मंडळींकडून तिचा अमानुष छळ केला जात होता.

Vaishnavi Hagawane Suicide Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हिच्या लग्नात घरच्यांनी भरभक्कम हुंडा दिलेला असला तरी सासरच्यांकडून तिचा छळ चालूच होता. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तर आमच्या वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. असे असतानाच आता वैष्णवी आणि तिचा पती शशांक यांच्या प्रेमविवाहीची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांनी लावली होती हजेरी
वैष्णवी आणि शशांक यांनी प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह असला तरी त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. या शाही लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हजेरी लावली होती. या लग्नाचे काही फोटो वैष्णवी, शशांक यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. आता मात्र तिचा नवरा आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने स्वत:ला संपवलं आहे.
दीर आणि सासरा सध्या फरार
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शशांक, वैष्णवीची सासू तसेच वैष्णवीची नणंद या तिघांना अटक केली आहे. तर वैष्णवीचा दीर आणि सासरा सध्या फरार आहेत. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विशेष म्हणजे वैष्णवीच्या प्रेमविवाहाचाही उल्लेख त्यांनी यात केला आहे.
तक्रारीत वैष्णवीच्या प्रेमविवाहाबाबत काय सांगितलं आहे?
वैष्णवीचे वडील आनंद साहेबराव कस्पटे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी वैष्णवीच्या आणि शशांक यांच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख केलाय. ‘मी शेतीचा व्यवसाय करतो. माझी मुलगी वैष्णवी व भुकुम येथील शशांक हगवणे याच्या मध्ये प्रेमसबंध असल्याचे मला माहिती झाले होते,’ असे दाखल तक्रारीत नोंदवलेले आहे.
नातेवाईकांकडे विचारणा केली आणि….
तसेच वैष्णवीचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी काय केलं, याचीही माहिती त्यांनी या तक्रारीत दिली आहे. वैष्णवीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्यामुळे मी हगवणे कुटुंबियांबाबत आमच्या नातेवाईकांकडे विचारणा केली. मुलाचे चारित्र्य, स्वभाव पाहिला. तसेच हगवणे कुटुंबीय सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याने मी वैष्णवी व शशांक यांच्या लग्नाबाबत विचार केला आणि लग्न लावून दिले, असेही आनंद कस्पटे यांनी सांगितले आहे.