चिठ्ठीत एका मुलीचा उल्लेख आणि फोन नंबर… घरातच आढळले पाच मृतदेह; अख्ख्या शहरात खळबळ

रायपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरात सापडलेल्या चिठ्ठीत मुलीचा उल्लेख व फोन नंबर आहे, ज्यामुळे तपास नवी दिशा घेत आहे. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक अडचणी व कर्जदारांच्या त्रासामुळे हे पाऊल उचलले असावे, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

चिठ्ठीत एका मुलीचा उल्लेख आणि फोन नंबर... घरातच आढळले पाच मृतदेह; अख्ख्या शहरात खळबळ
Chattisgarh
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 19, 2026 | 11:51 AM

छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या टिकरपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी धक्कादायक घटना घडली आहे. संजय नगरच्या एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांपाठोपाठ फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी धडकली आणि पुढील कार्यवाही सुरू झाली.

प्राथमिक माहितीनुसार, सर्व मृतक एकाच कुटुंबातील आहेत. तसेच ही सामूहिक आत्महत्या असल्याचंही सांगितलं जात आहे. पोस्टमार्टेम आणि फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजेल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी आत्महत्या केली. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. आमच्यासाठी हा धक्का आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

पोलीस घटनास्थळी

पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांशी पोलिसांनी संवाद साधला. या घटनेची माहिती घेतली. काही साक्षी पुरावे मिळवण्याचा प्रयत्नही केला. कौटुंबिक कलह, आर्थिक संकट वा इतर काही कारणाने या पाच जणांनी टोकाचं पाऊल उचललं का? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या कुटुंबीयांचे नातेवाईक अद्याप घटनास्थळी आलेले नाहीत. ते आल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकणार आहे. तसेच या मृतांच्या मोबाईलमधूनही काही सापडतं का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

म्हणून आयुष्य संपवलं…

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यातील चार लोक कोमात असल्यासारखं दिसून आले. त्यांच्या तोडातून फेस येत होता. तर कुटुंबप्रमुख हा तडफत होता. या सर्वांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्यात एका मुलीला बोलावण्याचा उल्लेख आहे. एका नातेवाईकाचा फोन नंबरही आहे. त्यामुळे आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत. तर हे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत होतं. अनेक देणेदार दारावर येत होते. त्यामुळे त्यांची परेशानी वाढली होती. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.

Follow Us