Raja Raghuvanshi Murder : राजा मर्डर केसमध्ये 8 व्या व्यक्तीची एंट्री, सोनमला पोलिसांपासून कसं वाचवलं ?
राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी राजाची पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राजसह आठ आरोपींना अटक केली आहे. याशिवाय, सोनमला लपण्यास मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मदतीने सोनम पोलिसांपासून दूर राहिली.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवीन पात्रांची भर पडत आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली आहे. या आठ आरोपींपैकी एक व्यक्ती असा आहे, ज्याने राजाच्या हत्येनंतर सोनमला लपण्यास मदत केली होती. किंवा असं म्हणू शकतो की सोनमला पोलिसांच्या नजरेपासून दूर ठेवण्यास तो मदत करत होता. या आरोपीचे नाव लोकेंद्र सिंह तोमर असून तो ग्वाल्हेरचा रहिवासी आहे.
लोकेंद्रने सोनमला कशी मदत केली? हे जाणून घेण्यापूर्वी, राजा हत्याकांडाबद्दल जाणून घेऊया. 11 मे रोजी इंदूरमध्ये राजा आणि सोनमचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते, जिथे राजाचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. सुरुवातीला पोलिस या प्रकरणाकडे अपघात म्हणून पाहत होते. पण जेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा राजाची हत्या झाल्याचे आढळून आले. या गुन्ह्याचा सूत्रधार दुसरं तिसरं कोणी नव्हे तर राजाची पत्नी सोनम होती.
सोमनला लपण्यास कोणी केली मदत ?
या हत्येप्रकरणी सोनम व्यतिरिक्त, पोलिसांनी तिचा प्रियकर राजा कुशवाहालाही अटक केली आहे. यासोबतच, गुन्हा घडवणारे तीन आरोपी आनंद, आकाश आणि विशाल यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी इंदूरमध्ये दोन लोकांना अटक केली आहे , त्यापैकी एक हा प्रॉपर्टी डीलर असून दुसरा इसम एक सुरक्षा रक्षक आहे. तर आठवा आरोपी लोकेंद्र सिंग तोमर आहे, ज्याच्या इंदूरमधील फ्लॅटमध्ये सोनम राहत होती. राजाच्या हत्याकांडाने अख्खा देश हादरलेला असताना आणि पोलिस आरोपीचा शोध घेत असताना, लोकेंद्रने सोनमला लपण्यास मदत केली.
त्याच्याच फ्लॅटमध्ये लपली होती सोनम
मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व्ही सिम यांच्या सांगण्यानुसार, राजाची हत्या केल्यानंतर सोनम इंदोरमध्ये ज्या घरात लपली, तो फ्लॅट मूळचा ग्वाल्हेरचा रहिवासी असलेला लोकेंद्र सिंग तोमर याच्या मालकीचा आहे. या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचे पुरावे नष्ट करणे आणि लपविल्याबद्दल तोमर हवा होता. अखेर त्याला अटक करण्यात आली.
हत्येनंतर सोनमने काढला इंदोरला पळ
मेघालयातील शिलाँगमध्ये राजाची त्या केल्यानंतर त्याची पत्नी सोनम ही इंदोरला पळून गेली. येथून ती बाय रोड उत्तर प्रदेशला गेली. एका टॅक्सी चालकाने असा दावा केला की, त्याने सोनमला गाझीपूर येथे सोडले. पोलिसांनी सोनमला गाझीपूर येथूनच अटक केली आहे. आता मेघालयातील शिलाँग पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रियकर राज कुशवाहासाठी पती राजा रघुवंशी याची हत्या केल्याचा आरोर सोनमवर लावण्यात आला आहे. सध्या पोलिस सोनम आणि राजची नार्को टेस्ट करण्याची तयारी करत आहेत.
