मिठी नदी 18 किमी लांब, तिथेच वस्तू कशा सापडल्या, वाझे-NIA चं कोर्टात घमासान, 26 लाखांपैकी 5 हजारच खात्यात शिल्लक

सचिन वाझे यांनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. | Sachin Waze NIA

  • Updated On - 4:37 pm, Sat, 3 April 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
मिठी नदी 18 किमी लांब, तिथेच वस्तू कशा सापडल्या, वाझे-NIA चं कोर्टात घमासान, 26 लाखांपैकी 5 हजारच खात्यात शिल्लक
सचिन वाझे

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयात शनिवारी सचिन वाझे (Sachin Waze) आणि NIAच्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी न्यायालयात केलेली एकूण मांडणी पाहता सचिन वाझे यांनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या NIAच्या हवाल्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. (26 lakh rupees withdrawn from Sachin Waze account after arrest)

सचिन वाझे हे गेल्या 23 दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. त्यांना आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेंच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले. हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे यांच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली.

‘मिठी नदीत नेमक्या त्याच जागी वस्तू कशा सापडल्या’

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना मिठी नदीच्या परिसरात नेले होते. एनआयएच्या दाव्यानुसार, यावेळी सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार मिठी नदीतून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, संगणक आणि सीपीयू अशा गोष्टींचा समावेश होता.

मात्र, वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांनी या सगळ्याविषयी शंका उपस्थित केली. मिठी नदी ही 17.84 किलोमीटर इतकी लांब आहे. तिची खोली जवळपास 70 मीटर इतकी आहे. मग सचिन वाझे यांनी फेकलेल्या वस्तू इतक्या दिवसांनी त्याच जागेवर कशा काय सापडल्या, असा सवाल आबाद पोंडा यांनी विचारला. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे या वस्तू एनआयएनेच प्लांट केल्याचे सूचित केले आहे.

‘सचिन वाझेंच्या अटकेनंतर खात्यातून 26 लाख रुपये काढण्यात आले’

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील अनिल सिंग यांच्या दाव्यानुसार, सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या खात्यातून 26 लाख रुपये काढण्यात आले. आता या खात्यात फक्त 5 हजार रुपये शिल्लक आहेत. तसेच वाझे यांच्या डीसीबी बँकेतील वाझे यांच्या लॉकरमधील कागदपत्रे NIAच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांची चौकशी सुरु असल्याचे अनिल सिंग यांनी सांगितले.

मात्र, सचिन वाझे यांच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला. ज्या खात्यामधून 26 लाख रुपये काढण्यात आले ते संयुक्त खाते (Joint Bank Account) आहे. तसेच माझ्या अटकेनंतर हे पैसे काढले गेले असतील तर तो एनआयएचा कमकुवतपणा आहे, असेही सचिन वाझे यांनी म्हटले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट होतील: वाझे

आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल 120 टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, अशी टिप्पणीही सचिन वाझे यांनी केल्याचे समजते.

मी NIA ला कोणतीही कबुली दिली नाही: वाझे

सचिन वाझे हे अंबानी स्फोटक प्रकरणात पुरते अडकल्याचे चित्र भाजपच्या नेत्यांकडून रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात सचिन वाझे यांनी अद्याप कोणत्याही कृत्याची कबुली दिलेली नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असे सचिन वाझे यांनी म्हटले.

NIA चे वकील काय म्हणाले?

* आरोपीच्या अंधेरी येथील डीसीबी बँकेच्या लॉकरकडून कागदपत्रं मिळाली आहेत. लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तूंची चौकशी, होणे गरजेचे आहे. * सीसीटीव्ही डेटाचा 120 टीबी डेटा आढळला. ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे. * आयपी adrss पडताळणी आवश्यक आहे. * जप्त केलेल्या कारची नंबर प्लेट तपासायची आहे. आतापर्यंत 7 मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत, शेवटची कार 2 एप्रिल रोजी जप्त करण्यात आली होती. * आरोपींचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी करावी लागेल. * मिठी नदीत शोध घेताना अनेक प्रकारच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यांची तपासणी करून पुष्टी करायची आहे. * याप्रकरणात आतापर्यंत 50 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

(26 lakh rupees withdrawn from Sachin Waze account after arrest)

Published On - 4:16 pm, Sat, 3 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI