सैफचा हल्लेखोर कसा सापडणार? पोलीस आपसातच भांडतायत, क्राइम ब्रांचचा वांद्रे पोलिसांवर काय आरोप?
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणाऱ्या पोलीस दलातच एकमत दिसत नाहीय. आता क्राइम ब्रांचने वांद्रे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत. या प्रकरणाच्या तपासासाठी 35 पोलीस पथक बनवण्यात आली आहेत. पण पोलीस आपसातच भांडत असल्याच चित्र आहे.

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटलेत, तरी अजून आरोपी सापडलेला नाही. CCTV मध्ये कैद झाल्यामुळे आरोपीचा चेहरा सगळ्यांना समजला आहे. पण आरोपी अजून हाताला लागत नाहीय. आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची 35 पथकं बनवण्यात आली आहेत. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी जिन्यावरुन उतरुन निघून गेला. तिथल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा कैद झाला. आरोपी सैफच्या घरातून निघाल्यानंतर वांद्रे रेल्वे स्टेशन जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. दादरच्या एका दुकानातून त्याने हेडफोन खरेदी केल्याच सुद्धा दिसलय. पण हा आरोपी अजून सापडत नाहीय. त्यामुळे मुंबई पोलिसांवरील दबाव वाढत चालला आहे.
आता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या पोलीस पथकांमध्येच आपसात जुंपल्याच चित्र निर्माण झालं आहे. मुंबई गुन्हे शाखेने वांद्रे पोलिसांच्या तपासावर टीका केली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अपेक्षित असलेली तात्काळ कारवाईची पावलं उचलली नाही असं गुन्हे शाखेच म्हणणं आहे. सैफ अली खान वांद्रयाच्या सतगुरु शरण इमारतीत राहतो. हा भाग वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर वांद्रे पोलीस सैफच्या घरी दाखल होणार हे स्वाभाविक आहे.
वांद्रे पोलिसांच काय चुकलं?
वांद्रे पोलिसांनी अन्य यंत्रणांना उदहारणार्थ गर्व्हमेन्ट रेल्वे पोलिसांना अलर्ट केलं नाही, असं मुंबई गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. असं झालं असतं, तर हल्लेखोरांचा पळण्याचा एक मार्ग बंद झाला असता. हल्ला झाल्यानंतर लगेच पावलं उचलली असती, तर हल्लेखोरला पकडता आलं असतं, असं वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलय. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास सैफ अली खानवर हा हल्ला झाला. हा गुन्हा घडल्यानंतर वांद्रे पोलिसांची जी प्रतिक्रिया होती, ते पूर्णपणे अपयशी ठरले. घटना घडल्यानंतर जवळपास साडेतीनतास त्यांनी जवळच्या अन्य पोलीस स्टेशन्सना, क्राइम ब्रांचला याबद्दल कळवलचं नाही.