मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून दोन दिवस उपचार, सांगलीत आणखी एका डॉक्टरला अटक

| Updated on: Jul 08, 2021 | 9:04 AM

पोलिसांनी इस्लामपुरातील आधार हेल्थ केअर हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करुन विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून दोन दिवस उपचार, सांगलीत आणखी एका डॉक्टरला अटक
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

सांगली : सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रातून एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. डॉ. महेश जाधव, डॉ. महेश दुधनकर यांच्यावर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे आरोप ताजे असतानाच आता इस्लामपुरातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. डॉक्टर योगेश वाठारकरला अटक करण्यात आली आहे. (Sangli Doctor Dr Yogesh Vatharkar arrested for treatment on dead body for bill)

पोलिसांनी इस्लामपुरातील आधार हेल्थ केअर हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करुन विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

आधार हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. फेब्रुवारी महिन्यात तक्रारदाराच्या 60 वर्षीय आईला उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. योगेश वाठारकरने तिच्यावर उपचार केले. नॉन कोव्हिड उपचारादरम्यान मार्च महिन्यात महिलेचा मृत्यू झाला. मात्र ही माहिती डॉक्टरांनी त्यांच्या मुलापासून लपवून ठेवली आणि मृतदेहावर उपचार सुरु ठेवले, असा आरोप केला जात आहे.

दोन दिवसांनी डॉ. वाठारकरने नातेवाईकांना बोलावून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 रुपयांचे ज्यादा बिल बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगलीच्या डॉ. दुधनकरांवरही आरोप

सांगलीच्या लव्हली सर्कलला डॉ. महेश दुधनकर यांचा कोव्हिड दवाखाना आहे. त्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिलं आकारल्याचा आरोप आहे. 80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. दुधनकर जबाबदार असल्याचा दावा केला जात आहे. दुधनकरांना महापालिकेने परवाना कसा दिला, या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, जर या डॉक्टरांना आयुक्त आणि आरोग्य अधिकारी पाठिशी घालत असतील, तर त्यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे.

87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी डॉ. महेश जाधव अटकेत

दुसरीकडे, मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात सांगलीतील डॉ. महेश जाधव (Dr Mahesh Jadhav) याच्या अटकेनंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढतानाच दिसत आहे. तीन रुग्णवाहिका चालकांनाही सांगलीतील गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता 13 वर गेली आहे.

संबंधित बातम्या :

80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

(Sangli Doctor Dr Yogesh Vatharkar arrested for treatment on dead body for bill)