मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

डॉ महेश जाधव याच्याविरोधात आतापर्यंत 16-17 नातेवाईकांनी तक्रारी दिल्या आहेत. तर पोलीस कोठडीत असलेल्या अकाऊण्टंट निशा पाटील हिच्या घराचीही काल पोलिसांनी झडती घेतली

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर
Dr Mahesh Jadhav

सांगली : मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात सांगलीतील डॉ. महेश जाधव (Dr Mahesh Jadhav) याच्या अटकेनंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढतानाच दिसत आहे. तीन रुग्णवाहिका चालकांनाही सांगलीतील गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता 13 वर गेली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या अकाऊण्टंट निशा पाटीलच्या घराचीही पोलिसांनी काल झडती घेतली. (Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Ambulance Driver arrested)

रुग्णवाहिका चालकांना कमिशन

अपेक्स हॉस्पिटलमधील 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी डॉ महेश जाधव, त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव, अकाऊण्टंट निशा पाटील यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली होती. हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी डॉ महेश जाधव हा रुग्णवाहिका चालकांना 7 हजार रुपये कमिशन देत असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार सात हजार रुपये जमा झालेल्या तीन रुग्णवाहिका चालकांना गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 13 झाली आहे.

निशा पाटीलच्या घराचीही झडती

गुन्हा दाखल झाल्यानंतर अपेक्स रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णांचे नातेवाईकही पुढे आले आहेत. डॉ महेश जाधव याच्याविरोधात आतापर्यंत 16-17 नातेवाईकांनी तक्रारी दिल्या आहेत. तर पोलीस कोठडीत असलेल्या अकाऊण्टंट निशा पाटील हिच्या घराचीही काल पोलिसांनी झडती घेतली. हस्ताक्षराबाबत पुरावे जमा करण्यासाठी ही झडती घेतल्याचे सांगण्यात आले.

डॉ. मदन जाधवकडून कागदपत्रांची व्यवस्था

डॉ महेश जाधवला कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे डॉ मदन जाधव यांनी दिली होती. डॉ मदन जाधव आणि बस्वराज कांबळे या दोघांना शनिवारी पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ मदन जाधव हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सांगली येथे त्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील आरोपीची संख्या आता 10 झाली आहे.

काय आहे प्रकरण?

मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलमधील 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर महेश जाधवने या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तपासासाठी डॉ महेश जाधव याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर डॉक्टरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ झाली आहे. तर रुग्णालयाच्या अकाउंटंट निशा पाटील यांनाही मिरज पोलिसांनी अटक केली होती. त्यांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, डॉ. जाधवच्या पोलीस कोठडीत वाढ, अकाऊंटंट महिलेलाही बेड्या

(Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Ambulance Driver arrested)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI