भरदिवसा दुपारी प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या घरात शिरले, मानेला धारदार कोयता लावत दरोडा, सांगलीत भयानक थरार

सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावून दरोडा टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

भरदिवसा दुपारी प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या घरात शिरले, मानेला धारदार कोयता लावत दरोडा, सांगलीत भयानक थरार


सांगली : मैत्रिणीच्या सांगण्यावरुन मित्रांनी वृद्ध महिला डॉक्टरच्या घरी दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावून दरोडा टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे. या पाच जणांकडून एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावून दरोडा टाकल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटकेतील पाच जणांकडून 5 लाख 97 हजारांचे दागिने, 37 हजारांचा मोबाईल, 8 हजार रुपये रोख असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पायल आणि तिचा मित्र निखिल यांनीच कट आखला

अमित चंद्रकांत पाचोरे (वय 28), सचिन शिवाजी फोंडे (वय 27), रोहित देवगोंडा पाटील (वय 23), निखिल राजाराम पाटील (वय 31), आणि पायल युवराज पाटील (वय 31) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. आरोपी पायल पाचोरे ही डॉ. नाडकर्णी यांच्या ओळखीची होती. पायल आणि तिचा मित्र निखिल यांनीच कट रचून दरोड्याचा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

भर दुपारी घरात घटनेचा थरार

5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी घरामध्ये एकट्या असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिला डॉक्टरांच्या गळ्याला धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम लुटली. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणी तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते.

पोलिसांनी आरोपींना बेड्या कशा ठोकल्या?

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, नलिनी नाडकर्णी यांच्या ओळखीची पायल पाटील होती. नाडकर्णी यांच्या घरी त्यांचे सारखे येणे-जाणे होते. पायल पाटील हिने तिचा मित्र निखिल पाटील याच्यासोबत कट रचून घरात दरोडा टाकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाचोरे, फोंडे आणि रोहित पाटील यांची मदत घेतली. त्यावरुन नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगली येथे छापा टाकून पाच जणांना अटक केली.

पाच जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरुन गुन्हा केल्याची कबुली दिली. या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले 5 मोबाईल, 4 मोटारसायकली आणि एक कोयता असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा :

80 वर्षीय आजींचा मृतदेह गटारीत कुजलेल्या अवस्थेत, धुळ्यात एकच खळबळ

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI