1 कोटी 22 लाख मुंबईहून हैदराबादला जात होते… भली मोठी बॅग, संशय आला, रेल्वे स्थानकावरच हटकलं अन्….
सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईहून हैदराबादला नेली जाणारी ₹1.22 कोटींची संशयास्पद हवाला रोकड जप्त केली. अमरावतीचा विजय गुप्ता अटकेत असून, 'कांता ज्वेलर्स'ने ही रक्कम 'बंटी'ला पोहोचवण्यासाठी दिली होती.

तेलंगणाच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 22 लाखाची रोकड जप्त केली आहे. मुंबईहून हैदराबादला ही रक्कम नेण्यात येत होती. ही हवाला रक्कम असून या प्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती ही अमरावतीची आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे पैसे कुणाचे आहेत? कुणासाठी नेले जात होते? या पैशाचं काय करणार होते? कोणत्या कामाला वापरणार होते? याची सर्व माहिती रेल्वे पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्त कारवाई करत एका प्रवाशाकडून तब्बल 1 कोटी 22 लाख 70 हजार रुपयांची संशयास्पद हवाला रक्कम जप्त केली आहे. ही रोकड मुंबईहून हैदराबादला नेली जात होती. विशेष म्हणजे, या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी महाराष्ट्रातील अमरावतीचा रहिवासी आहे. विजय अंबादास गुप्ता (वय 40, रा. साईनगर, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
संशय आला आणि…
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी देवगिरी एक्सप्रेसमधून (ट्रेन क्र. 17057) एक प्रवासी संशयास्पदरित्या मोठी बॅग घेऊन प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बोल्लोराम आणि मलकजगिरी रेल्वे स्थानकांदरम्यान जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने संयुक्त तपासणी दरम्यान त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारी रोकड आढळून आली. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद होत्या. डोक्यावर भली मोठी बॅग घेऊन तो चोरासारखा इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या या हालचाली संशयास्पद वाटल्याने काही प्रवाशांनी पोलिसांना टीप दिली. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने कांगावा करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याची बॅग उघडली, तेव्हा नोटांचे बंडल पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले.
कितीच्या नोटा होत्या
500 रुपयांच्या नोटा : 1 कोटी 20 लाख रुपये (24,000 नोटा)
200 रुपयांच्या नोटा : 60 हजार रुपये (300 नोटा)
100 रुपयांच्या नोटा : 2 लाख 10 हजार रुपये (2,10)
एकूण जप्त रक्कम : 1,22,70,000 रुपये (1 कोटी 22 लाख 70 हजार)**
केवळ 5 हजार रुपयांचे अमिष
पोलिसी चौकशीत आरोपी विजय गुप्ता याने धक्कादायक खुलासा केला आहे. ही रक्कम त्याला मुंबईतील ‘कांता ज्वेलर्स’चा मालक संतोष सेठ याने दिली होती. ही रोकड सिकंदराबाद येथील मोंढा मार्केटमधील ‘बंटी’ नावाच्या सराफा व्यापाऱ्याला पोहोचवायची होती. हा सगळा व्यवहार ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित हवाला रॅकेटचा भाग असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे इतकी मोठी रक्कम मुंबई ते सिकंदराबाद पोहोचवण्यासाठी आरोपीला अवघे 5 हजार मिळणार होते.
कागदपत्रे दाखवण्यात अपयशी
या अफाट रकमेबाबत आरोपीकडे मालकी हक्क, उत्पन्नाचा स्रोत किंवा व्यवहाराशी संबंधित कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम जप्त करून आरोपीचा मोबाईल, ओळखपत्र आणि रेल्वे तिकीट ताब्यात घेतले आहे.
या धडक कारवाईबद्दल रेल्वे आणि रस्ते सुरक्षा आयजीपी के. रमेश नायडू यांनी जीआरपी आणि आरपीएफ पथकाचे कौतुक केले असून त्यांना योग्य बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पुढील तपास पोलीस आणि आयकर विभागाकडून केला जात आहे.