शनी-शिंगणापूर बनावट अॅप तपासाला वेग,देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम
या दोन्ही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, त्यांनी हे पैसे पुढे कोणाला दिले?, यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.

शनी- शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती मिळाली असून, या प्रकरणात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी थोड्या-थोड्या रकमेच्या स्वरूपात कधी १ लाख, कधी २ लाख अशा प्रकारे ही रक्कम त्यांच्या खात्यांत वळवली आहे. सध्या त्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
या प्रकरणात एका तक्रारीत पाच बनावट अॅप्सचा उल्लेख करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात केवळ हेच पाच नव्हे तर आणखीही काही बनावट अॅप्स कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पोलीस आता देवस्थानच्या अधिकृत ऑनलाईन एपची देखील चौकशी करत असून अधिकृत एपच्या माध्यमातून देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले का ? याचा देखील पोलीस तपास करण्यात येत आहे, एवढंच नाही तर अधिकृत एपच्या माध्यमातून किती रक्कम देवस्थान खात्यात जमा झाली आहे हे देखील तपासण्याचे काम पोलीस करीत आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून, देवस्थानच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याआधी सायबर विभागाच्या चौकशी नंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात पूजा परिसेवा डॉट कॉम, नवग्रह मंदिर डॉट कॉम, ऑनलाइन प्रसाद डॉट कॉम, हरी ओम अॅप आणि ई-पूजा डॉट कॉम या पाच बनावट अॅप्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तपासात आणखीन बनावट अँप उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे
