नवरा बाहेर जाताना आशाराणीला घरात कोंडून ठेवायचा, मोबाईल देत नव्हता; बहिणीचा धक्कादायक आरोप

सोलापुरात आशाराणी भोसले यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता हत्याचा आरोप समोर आला आहे. तिच्या बहिणीने सासरच्या छळ, पैसे आणि गाडीची मागणी, किडनॅप करून लग्न करण्याचे आरोप केले आहेत. आशाराणीला गळफास लावण्यासाठी तिचा हात पोहोचू शकत नव्हता असा दावा करत बहिणीने हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

नवरा बाहेर जाताना आशाराणीला घरात कोंडून ठेवायचा, मोबाईल देत नव्हता; बहिणीचा धक्कादायक आरोप
सोलापूरमध्ये आणखी एका विवाहीत महिलेने आयुष्य संपवलं
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 11:52 AM

वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच तसंच एक प्रकरण उघडकीस आलं आहे. सोलापुरात आशाराणी भोसले या विवाहितेने गळफास लावून जीवन संपवलं आहे. सासरच्या छळाला आणि नवऱ्याच्या संसाराला कंटाळून आशाराणीने जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कसून चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आशाराणी हिच्या बहिणीने तर या प्रकरणी अनेक धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

आशाराणी भोसले हिची बहीण उषाराणी हिने अत्यंत धक्कादायक आरोप केले आहे. आशाराणीची आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप उषाराणी यांनी केला आहे. मी देखील त्याच घरात राहत होते. मात्र सासूच्या जाचाला कंटाळून मी दुसरीकडे राहायला गेले. आशाराणीचा नवरा खूप संशय घेत होता, चारचाकी गाडी आणि पैशाची मागणी करत होता. तिला मोबाईल देत नव्हता, बाहेर जाताना बाहेरून कडी लावत होता, पाहिली मुलगी माझी नाही असा आरोप करत होता, असा आरोप उषाराणी यांनी केला आहे.

माझी बहीण आत्महत्या करूच शकत नाही

माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही. कारण गळफास घेतलेले ठिकाण उंच आहे. तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यांनी माझ्या बहिणीची हत्या केली आहे, असा दावाच उषाराणी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची आणि आरोपींना पकडण्याची मागणीही उषाराणी यांनी केली आहे.

किडनॅप करून लग्न

आशाराणी आणि उषाराणी या दोघ्या बहिणींना एकाच घरात दिले होते. मात्र, आशाराणी हिला किडनॅप करून तिच्याशी लग्न करण्यात आलं होतं, असा आरोप आशाराणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

काय घडलं?

आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहित महिलेने काल आत्महत्या केली आहे. सासू आणि नवरा तिच्याकडून सतत पैशाची मागणी करत होते. चारकी वाहनांचीही मागणी करत होते, असा दावा आशाराणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी आशाराणीची सासू आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेचं मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद आहे. मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा तीन महिन्याच्या गर्भवती होत्या. सासरचे लोक सारखे सातत्याने पैशाची मागणी करत होते. यापूर्वी त्यांनी मुलीला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते प्रकरण मिटवण्यात आले होते. पण त्यानंतरही तिला पुन्हा मारहाण केली जात होती. त्यामुळे या छळाला वैतागूनच तिने काल आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

तिघेही जेरबंद

आशाराणीचा नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरे बलभीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पवनला रात्रीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज सासू आणि सासऱ्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पवन भोसले, अलका भोसले, बलभीम भोसले या तिघां विरोधात BNS कलम 80(2), 115(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.