Jalgaon Crime : जळगावात अज्ञाताकडून दगडफेक आणि गोळीबार, कारण काय?

आठभरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Jalgaon Crime : जळगावात अज्ञाताकडून दगडफेक आणि गोळीबार, कारण काय?
जळगावमध्ये अज्ञातांकडून गोळीबार
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 28, 2023 | 8:36 AM

जळगाव / 28 जुलै 2023 : आठवडाभरापूर्वी घडलेली घटना ताजी असतानाच जळगावात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. जळगाव शहरातील शिवाजी नगरात एका नागरिकाच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा गोळीबार कुणी केला? कोणत्या कारणातून केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. अचानक गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

आठभरातील दुसरी घटना

जळगावातील केसी पार्क परिसरात त्रिभुवन कॉलनीत अशोक माने हे आपल्या कुटुंबासह राहतात. काल रात्री त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक आणि गोळीबार केला. यानंतर आरोपी पळून गेले. जळगाव शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. गेल्या आठ दिवसांपूर्वी याच परिसरातील गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज

सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाला नाही. जुन्या वादातून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तपासाअंती सर्व स्पष्ट होईल. आरोपींना दोन ते तीन राऊंड फायर केले. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींच्या अटकेनंतर गोळीबाराचे कारण स्पष्ट होईल.