अमरत्वाचा सोस, पत्नीने पतीला घरामागे जिवंत गाडले, दोन दिवसांनी मुलीला आढळला मृतदेह

छातीत दुखू लागल्याने पतीने आपल्या पत्नीला जिवंत गाडण्याची विनंती केली. या कृत्यामुळे त्याला अमर होण्यास मदत होईल, असेही तो म्हणाला. त्यानुसार तिने खड्डा खणून त्याला पुरले

अमरत्वाचा सोस, पत्नीने पतीला घरामागे जिवंत गाडले, दोन दिवसांनी मुलीला आढळला मृतदेह
क्राईम
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 9:26 AM

चेन्नई : पत्नीने आपल्या स्वयंघोषित ज्योतिषी पतीला जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील पेरुम्बक्कम येथे उघडकीस आली आहे. अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून पतीनेच आपल्याला जिवंतपणी पुरण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा तिने केला आहे. बाहेरगावाहून घरी परतल्यावर त्यांच्या मुलीला हा प्रकार समजला आणि तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, तामिळनाडूतील पेरुम्बक्कम येथील कलैग्नार करुणानिधी नगर येथील रहिवासी असलेला नागराज हा एक स्वयंघोषित ज्योतिषी होता. तो आपण देव-देवतांशी संवाद साधत असल्याचा दावा करत असे. अलिकडेच तामिळनाडूतील काही मंदिरांना भेट दिल्यानंतर त्याने आपल्याला दैवी आशीर्वाद मिळाल्याचे सांगितले होते.

नागराजने त्याच्या घरामागील अंगणात एक मंदिर देखील बांधले होते आणि लोकांना त्यांच्या भविष्याचे भाकित जाणून घेण्यासाठी मंदिराला भेट देण्यास तो आमंत्रित करत असे.

जिवंतपणी पुरण्याची पत्नीला विनंती

16 नोव्हेंबरला नागराजला छातीत दुखू लागले आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितले की काही काळातच तो प्राण सोडेल. परंतु त्याआधीच त्याने बायकोला जिवंत गाडण्याची विनंती केली. या कृत्यामुळे त्याला अमर होण्यास मदत होईल, असेही तो म्हणाला.

नागराजला बसलेल्या अवस्थेत पुरले

पत्नी लक्ष्मीने त्याची मागणी मान्य केली. दुसऱ्या दिवशी तिने दोघा जणांना जमिनीत खड्डा खणण्यासाठी बोलावले. हा खड्डा पाण्याची टाकी बांधण्यासाठी असल्याचं तिने कामगारांना सांगितलं. 17 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीने नागराजला बसलेल्या अवस्थेत पुरले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता, अशी माहिती आहे.

आईची धक्कादायक कबुली

कामानिमित्त बाहेर गेलेली नागराज-लक्ष्मी यांची कन्या थामीझारासी शुक्रवारी घरी परतली. आपले वडील बेपत्ता असल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला. तर तिची आई या घटनेबद्दल मौन बाळगून होती. तिने सतत आईला याबाबत प्रश्न विचारले असता, शेवटी तिने वडिलांना जिवंतपणी जमिनीत पुरले असल्याचे कबूल केले.

मुलीने तत्काळ पेरुम्बक्कम पोलिसांत तक्रार दिली आणि नागराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मात्र शवविच्छेदन अहवालाच्या आधारेच नागराज पुरले त्यावेळी जिवंत होता की मृत होता, हे समजू शकते असे सांगितले.

संबंधित बातम्या :

‘बिग बॉस मराठी 2’ विजेता शिव ठाकरे भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला

आधी मुलांना पाणी पाजले, मग एक एक करुन विहिरीत फेकले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या

पंढरपूरला देवदर्शन, मग बायकोच्या माहेरी, नंतर वडिलांची भेट, अखेर पती-पत्नीचा गळफास