Saif Ali Khan Attack : सैफच्या स्टाफने हल्लेखोराला पकडून फ्लॅटमध्ये बंद केलेलं, मग तो बाहेर कसा निघाला?
Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीला सैफ-करीनाच्या स्टाफने पकडून रुममध्ये बंद केलेलं. मग, तरीही आरोपी बाहेर कसा आला? पोलिसांनी आता याबाबत खुलासा केला आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी नागरिक आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून चाकू हल्ला झाला. सुदैवाने सैफ या प्राणघातक हल्ल्यातून बचावला. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी मध्यरात्री ठाण्यातून पकडण्यात आलं. मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहझाद असं या हल्लेखोराच नाव आहे. तो बांग्लादेशी आहे. सैफवर हल्ला करुन हा आरोपी त्याच्या घरातून कसा निसटला? याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर सैफच्या स्टाफने हल्लेखोराला पकडलं व फ्लॅटमध्ये बंद केलं. सगळ्यांना वाटलं की, हल्लेखोर आतमध्ये आहे. पण तो तिथून निसटला होता. हल्लेखोराला ज्या रुममध्ये बंद केलं होतं, तिथे बाहेरच्या बाजूला उघडणारी एक खिडकी होती. त्या आधारे हल्लेखोर बंद खोलीतून बाहेर पडला.
“सैफच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोर 16 जानेवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वांद्रे पश्चिमेला असणाऱ्या पटवर्धन गार्डन येथे झोपला होता. त्यानंतर त्याने ट्रेन पकडली व वरळीला आला” पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला ही माहिती दिली. इमारतीत दोन भिंतींच्यामध्ये पाईपलाईनची जागा असते. त्या पाईपलाईनने तो सहाव्या ते 12 व्या मजल्यापर्यंत चढून गेला. “आमच्या चौकशीनुसार तो सातव्या-आठव्या मजल्यापर्यंत जिन्याने चढून वर गेला. तिथून डक्ट एरिया म्हणजे छोटीशी मोकळी जागा असते, तिथे गेला. तिथून पाईपलाइवरुन चढून सैफच्या घरात प्रवेश केला. बाथरुमच्या खिडकीतून तो आत शिरला. म्हणून तो बाथरुममधून बाहेर आला” असं पोलिसांनी सांगितलं. सैफच्या घरातील स्टाफने सर्वप्रथम त्याला बाथरुममधूनच बाहेर पडताना पाहिलं.
बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू
सैफच्या स्टाफकडे त्याने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. नंतर सैफ बरोबर झालेल्या झटापटीत चाकूने त्याच्यावर हल्ला केला. सैफ अली खानने त्याला फ्लॅटमध्ये बंद केलं होतं. पण तो खिडकीद्वारे बाहेर निघण्यात यशस्वी ठरला. पोलिसांना त्याच्या बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. पोलिसांना सांगितलं की, “आरोपीला हे माहित नव्हतं की, तो सैफ अली खानच्या घरात आला आहे. टीव्ही चॅनल पाहिल्यानंतर त्याला समजलं की, त्याने ज्याच्यावर हल्ला केला, तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे”