दमणला सापडलेल्या वाझेंच्या व्हॉल्वो कारची फॉरेन्सिक तपासणी; गाडीत जीन्स-शर्ट, चूर्ण सदृश्य बाटल्या आणि…

| Updated on: Mar 23, 2021 | 3:08 PM

गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. (Sachin Vaze Volvo Car Daman)

दमणला सापडलेल्या वाझेंच्या व्हॉल्वो कारची फॉरेन्सिक तपासणी; गाडीत जीन्स-शर्ट, चूर्ण सदृश्य बाटल्या आणि...
फॉरेन्सिक टीमकडून सचिन वाझेंच्या व्हॉल्वो कारची तपासणी
Follow us on

ठाणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. एटीएसने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची वॉल्व्हो कार थेट दमणमधून जप्त केली आहे. या कारच्या डिकीत सापडलेल्या बॅगेत जीन्स, पांढरा शर्ट असं काही सामान मिळालं आहे. तर दोन चूर्ण सदृश्य बाटल्या आणि एक सॅनिटायझरचा कॅनही सापडला आहे. (Thane ATS Office Forensic Team search in Sachin Vaze Volvo Car found in Daman)

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) टीमला वॉल्व्हो कारच्या डिकीमधून दोन बॅग सापडल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि पांढरा शर्ट मिळाला आहे. त्या बरोबरच एक मास्क आणि मोबाईल चार्जरही आढळला आहे. एकूण तीन जोड कपडे आणि टॉवेल सापडले आहेत.

चूर्ण सदृश्य बाटल्या आणि सॅनिटायझरचा कॅन

गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. गाडीत सापडलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर बोटांचे ठसे चेक केले जात आहेत. गाडीत पायाखाली असलेल्या मॅट झटकून त्यावरची माती ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीत अन्यत्र कुठेही बोटांचे ठसे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

व्हॉल्वो कार वाझेंच्या पार्टनरची?

दमण येथे सापडलेली ही कार सचिन वाझेंच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दमण येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमणमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेंच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे.

प्रिंटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत

एनआयएने विनायक शिंदेच्या फ्लॅटमधून एक प्रिंटर जप्त केला आहे. धमकावणारे पत्रं लिहिण्यासाठी याच प्रिंटरचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अँटालिया येथील स्फोटकांच्या कारमध्ये सापडलेलं पत्रं याच प्रिंटरद्वारे प्रिंट करण्यात आल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयएने हा प्रिंटर जप्त करून चौकशीसाठी पाठवला आहे. तसेच सचिन वाझेच्या कार्यालयातून एक महत्त्वाची डायरीही एनआयएच्या हाती लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बनावट आधारकार्ड, पंचतारांकित हॉटेलात मुक्काम

वाझेंच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकीत हॉटेलात राहत होते. वाझेंकडून बनावट आधारकार्डही जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझे 16 फेब्रुवारी रोजी हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. (Thane ATS Office Forensic Team search in Sachin Vaze Volvo Car found in Daman)

हप्ते वसुलीची डायरी हाती?

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

संबंधित बातम्या :

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

एटीएसला आणखी एक कार दमनमध्ये सापडली; वाझेंचे ‘कार’नामे उघड होणार?

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त, पंचतारांकित हॉटेलात सीसीटीव्ही NIA च्या ताब्यात

(Thane ATS Office Forensic Team search in Sachin Vaze Volvo Car found in Daman)