तो हॉटेलमधून बाहेर पडला, चुकून धक्का लागला अन् क्षणार्धात… डोंबिवली हादरली
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत आकाश सिंगचा किरकोळ वादातून खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मालवण किनारा हॉटेलसमोर ही घटना घडली. नवी मुंबईतील कॉल सेंटर कर्मचारी असलेल्या आकाशला धारदार शस्त्राने संपवण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स, बारवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक रक्तरंजित घटना समोर आली आहे. मालवण किनारा हॉटेल समोर शनिवारी रात्री उशिरा आकाश सिंग या तरुणाला केवळ किरकोळ धक्का लागल्याच्या वादातून आपला जीव गमवावा लागला. आकाश सिंग हा तरुण नवी मुंबई येथील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होता. या घटनेने डोंबिवली हादरली आहे.
नेमकं काय घडलं?
आकाश सिंग हा तरुण कामावरून सुट्टी घेऊन डोंबिवलीला आला होता. शनिवारी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास तो हॉटेलमधून बाहेर पडत असताना, त्याचा हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी तरुणाला किरकोळ धक्का लागला. या किरकोळ धक्का लागल्यामुळे त्या दुसऱ्या तरुणाने तात्काळ आकाश सिंगसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या त्या तरुणाने आपल्या साथीदारांना त्वरीत घटनास्थळी बोलावून घेतले.
त्याचे साथीदार येताच, त्यांनी कोणताही विचार न करता आकाश सिंग याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी केलेल्या गंभीर वारामुळे आकाश सिंग रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांची विशेष पथके कार्यरत
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी हत्येचा (कलम ३०२) गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी हॉटेल परिसरातील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त केले. त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
या घटनेमुळे मानपाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक हॉटेल्स, बार, डान्स बार आणि ढाबे वेळेच्या नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. यामुळे मद्यपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर वाढतो. या प्रकारच्या घटनांनी नागरिक धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी या आस्थापनांच्या बाहेर होणारे वाद आणि त्यातून घडणारे गुन्हे वाढत असल्याने, या आस्थापनांवर कठोर कारवाई करून ते वेळेत बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या मानपाडा पोलीस आरोपींचा शोध घेत असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
