8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

काही घटना इतक्या भयानक घडतात की त्या सांगतानाही अवघडल्यासारखं वाटतं. देशात महिला अत्याचाराच्या इतक्या भीषण आणि भयानक घटना समोर येत आहेत की आता या घटना सांगताना आमचे शब्द अपुरे पडतील की काय, असं वाटायला लागलंय.

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?
प्रातिनिधिक फोटो

दिसपूर : काही घटना इतक्या भयानक घडतात की त्या सांगतानाही अवघडल्यासारखं वाटतं. देशात महिला अत्याचाराच्या इतक्या भीषण आणि भयानक घटना समोर येत आहेत की आता या घटना सांगताना आमचे शब्द अपुरे पडतील की काय, असं वाटायला लागलंय. कारण आसाममध्ये जी घटना घडलीय त्यातल्या पीडितेचं वय आणि तिची निर्घृण हत्या करणाऱ्यांचं वय हे इतकं कमी आहे की, या पिढीची वाटचाल आता कोणत्या दिशेला चाललीय? असा प्रश्न मनात निर्माण होईल. आरोपी अल्पवयीन मुलांचं चिमुकलीची हत्या करण्यामागील कारणही धक्कादायक आणि समजाला चिंता करायला भाग पाडणारं असं आहे. त्यामुळे अशा घटनांवर आता विचार करायची वेळ आलेली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही आसामच्या नगांव जिल्ह्यात घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी एका 6 वर्षाच्या चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केलीय. या हत्येमागील कारण हे आपल्याला हादरवून सोडेल असंच आहे. मृतक सहा वर्षीय मुलीला आरोपी मुलांनी मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला. पण ते व्हिडीओ बघण्यास तिने नकार दिल्याने संतापलेल्या आरोपी मुलांनी तिची दगडाने ठेचून हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी मुलांचे वय हे अवघं 8 ते 11 वर्षांच्या दरम्यान आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर आसाम राज्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही मंगळवारी (19 ऑक्टोबर) घडली. आरोपी तीन अल्पवयीन मुलं पीडितेला गोड बोलून घराजवळील दगडाच्या एका खदानीजवळ घेऊन गेले. तिथे त्यांनी पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने त्यांना ते पाहण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह परिसरातील सार्वजनिक शौचालयात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित प्रकार जेव्हा उघड झाला तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास सुरु केला. पीडिता सर्वात शेवटी कुणासोबत बाहेर गेली होती, कुणी तिला शेवटी कसं बघितलं? या प्रश्नांचा शोध घेत असताना पोलीस अखेर आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीच्या पित्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं असता अल्पवयीन आरोपींची बालसुधारणगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा :

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI