Vaishnavi Hagawane Case : हगवणे बंधुंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप, प्रमोशन कसं झालं?
Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबाशी संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे आरोप होत आहेत. हगवणे बंधुंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप झाले आहेत. गुन्हे दाखल असतानाही प्रमोशन कसं काय झालं? असा प्रश्न विचारला जातोय.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. आता या हगवणे कुटुंबाशी संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे आरोप होत आहेत. आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा लागतात. जालिंदर सुपेकर यांच्याकडून आधीच कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
आता जालिंदर सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्याबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी थार गाडीचा उपयोग केला, ती थार गाडी संकेत चोंधे याची होती. याच संकेत चोंधेच्या भावाच्या पत्नीने छळवणूक होत असल्याबाबत खडक पोलीसात तक्रार दिली होती. यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप तक्रारदार धनश्री चोंधे यांनी केला आहे.
प्रमोशन कसं काय झालं?
जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव, हाणामारी व जीवे मारण्याचा प्रयत्न. ॲट्रॉसिटी हे गुन्हे दाखल आहेत. मात्र, तरी देखील त्यांचं प्रमोशन कसं काय झालं? असा प्रश्न विचारला जातोय.
सुपेकरांवर 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप
यामागे जालिंदर सुपेकर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुशील हगवणे आणि शशांक हागवणे यांना शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचा यापूर्वीच आरोप झालाय. अमरावतीलमधील कैद्याच्या वकिलाने सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय. सुपेकरांवर 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप. जामिनासाठी हे पैसे मागितल्याचा आरोप होतोय.
खोटा पत्ता दाखवून मिळवला शस्त्रास्त्र परवाना
वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे. हगवणे बंधुंकडे तीन शस्त्र आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवले. हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी त्या फाईलवर त्यांची जी स्वाक्षरी आहे, त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हगवणे बंधुंनी खोटा पत्ता दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रास्त्र परवाना मिळवला होता.
