
मुंबईत गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एका इसमाने त्याच्या अल्पवयीन भाचीला लोकलमधील ढकलून तिचा खून केला. चालत्या लोकलमधून खाली पडल्याने 16 वर्षांच्या मुलीचा रुळांवर आपटून दुर्दैवी मृत्यू झाला. लोकलमधले प्रवासी ते दृश्य पाहून हादरलेच, पण त्यांच्यापैकीच काही जणांनी हिंमत दाखवत त्या आरोपीला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता मुंबईत आणखी एक असाच भयानक गुन्हा घडला आहे. विरारमध्ये पाणी भरायला गेलेल्या इसमाने त्याचा जीव गमावला (Crime news) , तोही अगदी शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणी भरण्याच्या शिल्लक वादातून एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडावर फवारून निर्घृण हत्या केली. विरारच्या जेपी नगर मध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करून, तिला अटक केली आहे. उमेश पवार (वय 57) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून, कुंदा उत्तेकर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
नेमकं झालं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत उमेश पवार हे विरार पश्चिमेच्या जेपी नगर भागात 15 नंबर इमारतीमध्ये रहायचे. त्यांच्या समोर राहणारी कुंदा उतेकर या महिलेशी त्यांचं गेल्या काही काळापासून पाणी भरण्याच्या मुद्यावरून भांडण सुरू होतं.त्या नर्स आहेत. मंगळवारी रात्री पवार आणि उतेकर या दोघांमध्ये पुन्हा याच मुद्यावर वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात उतेकर यांनी डास मारण्याच्या स्प्रेची बॉटल उचलून त्यातील स्पेर पवार यांच्या तोंडावर थेट फवारला. मात्र त्यामुळे पवार हे बेशुद्ध होऊन धाडकन खाली कोसळले.
ते पाहून त्यांचे कुटुंबीय आणि शेजारच्या इतर लोकांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र सुमारे दीड तासांनंतर पवार यांचं निधन झालं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. स्प्रेच्या रासायनिक परिणामामुळे पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली. पोलिसांनी आरोपी महिला कुंदा तुपेकर यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी आणि तितक्याच धक्कादाय घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र अफवा पसरवू नका आणि तपासात सहकार्य करा असे आवाहन पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना केलं आहे.