ज्या न्यायालयात तारखेला जायचे, त्याच न्यायालयाच्या हद्दीत दरोडा घालायचे; आंतरराज्यीय टोळीला पकडण्यासाठी पोलिसांचा जबरा प्लान
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार शिरासाड फाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विरार गुन्हे कक्ष शाखा 03 च्या टीमला मोठे यश मिळाले असून त्यांनी या टोळीतील 6 जणांना एकाच वेळी अटक केली.

मुंबई | 12 जानेवारी 2024 : मुंबई पोलिसांनी कुख्यात आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड करून त्यांना अटक केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार शिरासाड फाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विरार गुन्हे कक्ष शाखा 03 च्या टीमला मोठे यश मिळाले असून त्यांनी या टोळीतील 6 जणांना एकाच वेळी अटक केली आहे, त्यामध्ये एका 24 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची घेऊन या गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या टोळीकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दरोड्यासाठी लागणारे बरेचसे साहित्य, एक कार, रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली.
गुन्हेगारांची ही टोळी अतिशय चलाख आणि क्रूर असल्याच बोलले जात होते. दरोडा, घरफोडी, तसेच हे करताना जर कोणी आडवे आले तर त्याच ठिकाणी त्याची हत्या करून ही टोळी फरार होत होती. अशा कुख्यात क्रूर टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ज्या न्यायालयात तारखेसाठी जायचा त्याच हद्दीत करायचा चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण कुख्यात आणि क्रूर दरोडेखोर आहेत. मनीष उर्फ राजू मोहन चव्हाण, भाऊसाहेब शंकर गवळी, अश्विनी रूपचंद चौहान, रवींद्रसिंग सुखराम सोळंखी, सुखचेन रेवत पवार अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे असून, मनीष उर्फ राजू हा या टोळीचा मुख्य आहे. तर राजू, भाऊसाहेब आणि अश्विनी हे अहमदनगर जिल्ह्यातील वैजापूर, श्रीरामपूर आणि नेवासा येथील राहणारे आहेत तर इतर तिघे हे मध्यप्रदेशातील गुणा जिल्ह्यातील राहणारे आहेत.
त्यांच्यातील राजू हा मुख्य आरोपी हा राज्य परराज्यातील टोळी बनवून चोऱ्या करतो. 30 सप्टेंबर 2023 ला हा जेल मधून जामिनावर बाहेर आला होता. बाहेर पडल्यावर त्याने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवली. गुन्ह्यांच्या खटल्यासाठी तो ज्या न्यायालयात जायचा, त्याच न्यायालयाच्या हद्दीत खटल्याच्या आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी तो चोरी करायचा आणि फरार व्हायचा असे उघड झाले आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून टोळीतील हे गुन्हेगार देवस्थान, मंदिर, जत्रा या ठिकाणी मुक्काम करून, त्याच ठिकाणी कट रचून दरोडा, घरफोडी करून फरार व्हायची.
क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या मदतीने पकडले दरोडेखोर
5 जानेवारी रोजी ही टोळी विरार च्या जीवदानी मंदिर पायथ्याशी मुक्कामाला आली होती. विरार गुन्हे शाखा कक्ष 03 चे पीएसआय उमेश भागवत गस्त घालीत असताना त्यांना या टोळीचा संशय आला. त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना याची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ 8 जणांचे पथक बनवून त्याठिकाणी सापळा लावला. पण आरोपी क्रूर आणि कुख्यात असल्याचे लक्षात आल्यावर, पोलिसांनी जीवदानी हेलिपॅड वर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची मदत घेऊन, त्या सर्वांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी आरोपीनी पोलिसांवर हमला केला. यात एक पीएसआय सह दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. पण पोलिसांनी बळाचा वापर करून 6 ही आरोपीना अटक करण्यात यश मिळविले.
10 लाखांचा मुद्देमाल जप्त
ही टोळी कुख्यात व सराईत असून, यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, तसेच मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश या ठिकाणी गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ते वेळोवेळी टोळीतील माणसं बदलायचे आणि गुन्हे करायचे. या गुन्हेगारांमध्ये एका महिलेचाही समावेश असून ती गाडीत बसून आरोपीना सोडणे, त्या ठिकाणावरून आणणे, हे काम करायची. महिला असल्याने तिचा कुणालाही संशय येत नव्हता.
ज्या ठिकाणी ही टोळी दरोडा किंवा घरफोडी करण्यासाठी जायची त्याठिकाणी ते दारू ही पित होते. दरोडा घालताना जर कोणी पाहिलं किंवा कोणी समोर आला तर ते सरळ त्याची हत्या करून तेथून फरार व्हायचे. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत त्यांनी हत्या करून घरफोडी केली असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.
त्यांच्याकडून एक स्कॉर्पीओ, एक आटो रिक्षा, लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, बॅट-या, नायलॉनच्या दोरी, दोन लोखंडी कटवन्या, मिरची पावडर, मोबाईल फोन, दागिने, व रोख रक्कम असा 10 लाख 16 हजार 356 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कुख्यात क्रूर टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
