कल्याण स्थानकात पुन्हा महिलेची छेडछाड, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वी कामाला जाणाऱ्या तरुणीच्या छेडछाडीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा कल्याण स्थानकात अशीच घटना उघडकीस आली आहे.

कल्याण स्थानकात पुन्हा महिलेची छेडछाड, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण रेल्वे स्थानकात महिलेची छेडछाड
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 04, 2023 | 10:53 AM

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक कायमच चर्चेत असते. चोरी, खुलेआम गुन्हेगारीमुळे या स्थानकात वावरताना प्रवाशांना कायम सावध रहावे लागते. तर गेले काही दिवसांपूर्वी माथेफिरू गर्दुल्याने कामाला जाणाऱ्या तरुणीला मिठी मारल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा या स्थानकात एक विचित्र घटना घडली आहे. एका दारूच्या नशेत धुंद असलेल्या माथेफिरूने स्थानकात एका महिला प्रवाशाची छेड काढत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. मग काय संतप्त महिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाला स्टेशनवरच चोप देण्यास सुरवात केली. लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात ग्रस्त घालणाऱ्या कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत, दारूच्या नशेत धुंद असलेल्या तरुणाला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.

महिला ट्रेन पकडण्यासाठी जात असताना घडली घटना

कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 1 वर सायंकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी जात होती. यावेळी अचानक एका दारूच्या नशेत धुंद असलेल्या माथेफिरूने तिची छेड काढण्यास सुरवात केली. महिलेने आधी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, मात्र त्या तरुणाने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरडा करत तरुणाला विरोध करण्यास सुरवात केली. मग काय संतप्त झालेल्या झालेल्या महिलेने आणि इतर प्रवाशांनी छेड काढणाऱ्या तरुणाला स्टेशनवरच चोप देण्यास सुरुवात केली.

छेडछाडीच्या घटना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान

लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात ग्रस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले. काही दिवसापूर्वीही अशीच घटना घडली होती. यामुळे स्टेशन परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपी, गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. कारवाई करूनही इतर स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास करून येणाऱ्या मद्यपी, गर्दुल्ले यांना रोखायचे कसे असा प्रश्न रेल्वे लोहमार्ग पोलिसांना पडला आहे. स्थानकातील वाढत्या गुन्हेगारीबरोबरच छेडछाडीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.